Congress: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल, नाना पटोले यांनी घेतली सोनिया आणि राहुल गांधींची भेट



ब्युरो टीम: महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी घडत असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्ली गाठली असून आज त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली.

या भेटीत राज्यात पक्ष संघटनेत फेरबदल करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती पटोले यांनी माध्यमांना दिली. त्यामुळे काँग्रेस राज्यात भाकरी फिरवताना कोणाची गच्छंती करणार आणि कोणाला संधी देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने गुरुवारी निकाल दिला. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला असताना काँग्रेसने मात्र राज्यात संघटनात्मक फेरबदल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यात प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ गटनेताही बदलला जाऊ शकतो, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात आहे. आज राहुल गांधी तसेच सोनिया गांधी यांची '10 जनपथ' या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केल्यानंतर नाना पटोले यावर बोलले.

- सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील पक्ष संघटनेतील फेरबदलांबाबत चर्चा झाल्याचे नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यात पक्षांतर्गत फेरबदल अपेक्षित आहेत. अनेक नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. कर्नाटक निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर या नियुक्त्या केल्या जाव्यात, अशी अपेक्षा असून तशी मागणीच पटोले यांनी या भेटीत केली.

- सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबतचा निकाल, राज्यातील राजकीय परिस्थिती व महाविकास आघाडीची पुढील वाटचाल, यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

उपाध्यक्षांनी आमदारांना अपात्र ठरवायला हवे होते

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नको होता, असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. त्यावर बोलताना 'मी व्हिलन नाही तर हीरो आहे', असे पटोले म्हणाले. माझ्या राजीनाम्यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे अधिकार होते. त्यांनी आमदारांना अपात्र ठरवायला हवे होते, असे पटोले म्हणाले. मी असतो तर महाविकास आघाडीचे सरकारही वाचले असते, असेही त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने