d k shivakumar : कर्नाटकात सिद्धारमैया सरकार; हायकमांडचा अंतिम फैसला, डीके शिवकुमार यांच्याकडे कोणतं पद?



ब्युरो टीम: मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. 20 मे रोजी दुपारी 12.30 वाजजात बंगळुरू येथे नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे.

काँग्रेसने आज 18 मे रोजी पक्षाच्या विधीमंडळ गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. बंगळुरू येथे संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत विधीमंडळ गटनेता निवडीचे फक्त सोपस्कार पार पडणार आहे. यापूर्वी मुख्यमंत्री निवडीसाठी तीन पर्यवेक्षक नेमण्यात आले होते.

आमदारांचं मत जाणून घेण्यासाठी हे पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले होते. ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे, दीपक बावरिया आणि भंवर जितेंद्र सिंह यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. या नेत्यांनी आमदारांशी चर्चा करून दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना मत कळवलं होतं.

त्यानंतर पक्षात अनेक बैठका झाल्या होत्या. खरगे यांनी पक्षाच्या कार्यकारी नेत्यांशी चर्चा केल्या. त्यानंतर अखेरचा निर्णय घेतला. बुधवारी संध्याकाळी सिद्धारमैया आणि डीके शिवकुमार यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. काँग्रेसने ट्विटरवर या दोन्ही नेत्यांचे राहुल गांधींसोबतचे फोटो शेअर केले होते. त्यात राहुल गांधी यांना जननायक संबोधण्यात आले होते. यापूर्वी रणदीप सुरजेवाला यांनी मुख्यमंत्रीपदी सिद्धारमैया बसणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे डीके शिवकुमारच मुख्यमंत्री होणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, सिद्धारमैया यांनी मुख्यमंत्रीपदावरील दाव्यातून माघार घेण्यास नकार दिला होता.

दरम्यान, सिद्धारमैया आणि डीके शिवकुमार यांच्या बैठकीत अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावरही चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. मात्र, आता सिद्धारमैया किती वर्षासाठी मुख्यमंत्री राहतील याचा सस्पेन्स कायम आहे. शिवाय डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदासह आणखी कोणती खाती मिळणार हे सुद्धा अद्याप गुलदस्त्यात आहे. तसेच डीकेंकडे प्रदेशाध्यक्षपद राहणार का? याचंही गूढ कायम आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने