D k shivakumar: माझ्या घरी येऊ नका, मी खुश नाही; कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री म्हणाले लोकसभेवर लक्ष केंद्रित करा



ब्युरो टीम: कर्नाटकात एकहाती सत्ता मिळवल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी पहिल्यांदाच संवाद साधला.

सत्ता मिळाल्यानंतरही डीके शिवकुमार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर नाराजी व्यक्त केली. विधानसभेत १३५ जागा मिळाल्या तरी मी खूश नाही. माझ्या किंवा सिद्धरामय्यांच्या घरी येऊ नका. आपलं पुढचं ध्येय लोकसभा निवडणूक आहे आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने लढायचं आहे.

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने राज्यात २२४ पैकी १३५ जागा पटकावल्या. या विजयाचे श्रेय डीके शिवकुमार यांना दिलं जात आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना डीके शिवकुमार यांनी पुढच्या वाटचालीबद्दल मार्गदर्शन केलं.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी बंगळुरूच्या केपीसीसी कार्यालयात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. या वेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदी दहशतवादावर बोलतात. भाजपमधल्या कुणीही दहशतवादामुळे कोणत्याही कारणाने जीव गमावलेला नाही. भाजप आमच्यावर आरोप करते की आम्ही दहशतवादाचे समर्थन करतो पण इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांसारखे काँग्रेस नेत्यांना दहशतवादी हल्ल्यात प्राण गमवावा लागला.

शिवकुमार यांना काँग्रेसचे संकटमोचक मानलं जातं. वयाच्या ६१ व्या वर्षी ते आठव्यांदा आमदार झाले असून त्यांच्या संघटन कौशल्याच्या जोरावर पक्षाने राज्यात मोठी मुसंडी मारली. काँग्रेसच्या विजयाचं श्रेय त्यांनाच दिलं जातंय. मात्र त्यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागत आहे. काँग्रेसने शिवकुमार यांच्यावर अनेकदा विश्वास टाकला आहे. महाराष्ट्र, गुजरातमध्ये काँग्रेसला वाचवण्यासाठी डीके शिवकुमार यांनी मोलाची भूमिका बजावली होती.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने