Devendrafadnvis:सडक्या मेंदूतील सडक्या विचारांनाच फाशी देण्याची गरज; देवेंद्र फडणवीसांनी पाहिला 'द केरळ स्टोरी'



ब्युरो टीम: द काश्मीर फाईल्सनंतर आता 'द केरल स्टोरी' चित्रपटावरून देशातील वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे.

काही जण या चित्रपटाचे समर्थन करत असून, काही जण या चित्रपटाविरोधात सूर आळवत आहेत. पश्चिम बंगालमध्ये तर या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. राज्यातील नेते मंडळींकडूनही चित्रपटासंदर्भात प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागपुरात रात्री ९च्या सुमारास हा चित्रपट पाहिला. या चित्रपटावरून राजकारण तापले असताना फडणवीस यांनी चित्रपट पाहिल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर जबरी टीका केली.

धर्मांतरण व लव्ह-जिहादच्या मुद्द्यावरून चर्चेत असलेला 'द केरला स्टोरी' या चित्रपटाच्या विशेष शोचे भाजप कार्यकर्त्यांसाठी नागपुरात आयोजन करण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप महिला कार्यकर्त्यांनी हा चित्रपट पाहिला. या चित्रपटाच्या माध्यमातून कटू सत्य जनतेसमोर येत असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच, या चित्रपटाच्या निर्मात्याला फाशी द्या असं म्हणणाऱ्यांच्या सडक्या मेंदूतील सडक्या विचारांनाच फाशी देण्याची गरज असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. हा चित्रपट केवळ स्टोरी सांगण्यासाठी नसून जागृत करण्यासाठीच असल्याचंही त्यांनी म्हटलं.

 

मंगळवारी सायंकाळी मेडिकल चौकाजवळील मॉलमधील थिएटरमध्ये फडणवीस हे भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह चित्रपट पहायला पोहोचले. चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या देशातील विदारक सत्य समोर आणण्यात आले आहे. आपला देश पोखरण्याचे काम काही जणांकडून सुरू आहे. महिला व तरुणींची दिशाभूल करत त्यांना षडयंत्रात ओढले जात आहे. या गोष्टी समोर आल्या पाहिजे. या चित्रपटामुळे देशात मोठ्या प्रमाणात अनेक लोकांचे डोळे उघडत आहेत, असे फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले होते आव्हाड

'द केरल स्टोरी' चित्रपटाच्या नावाखाली एका राज्याची आणि तेथील महिलांची बदनामी करण्यात आली आहे. धर्मांतर करून इसिस संघटनेत गेलेल्या महिलांचा अधिकृत आकडा तीन आहे, तरीही चित्रपटात हा आकडा ३२ हजार इतका दाखवला आहे. ज्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे, त्याला सार्वजनिकरित्या फासावर लटकवले पाहिजे, असे खळबळजनक विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने