Eknathshinde: शिवसेनेला डबल लॉटरी! केंद्रातही मिळणार सत्तेत वाटा; मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक



ब्युरो टीम: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रातही मंत्रिपद मिळणार आहे. आज बोलावलेल्या शिवसेना खासदारांच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी आज शिवसेना खासदारांची बैठक बोलावली आहे. वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत, त्याआधी मुख्यमंत्री शिवसेना खासदारांची बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये राज्यातील केंद्रीय विकास कामांचा आढावा घेतला जाणार आहे, याचवेळी सर्व खासदारांसोबत मुख्यमंत्री केंद्रीय मंत्रीपदासंदर्भात चर्चाही करणार आहेत.

एक किंवा दोन कॅबिनेट मंत्रिपदं किंवा एक कॅबिनेट मंत्री आणि तीन केंद्रींय राज्य मंत्रिपदाबाबतही सर्व खासदारांसोबत मुख्यमंत्री चर्चा करणार असल्याची माहिती आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर दुसरीकडे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे राज्य मंत्रिमंडळ विस्तारालाही उशीर होत आहे. आधी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. शिवसेना आमदारांकडून विस्तारासाठी दबावाचं राजकारण सुरू आहे, पण विस्ताराचा निर्णय मात्र शिंदे-फडणवीस तसंच मोदी-शाह यांची जोडीच घेणार आहे, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी माध्यमाला दिली आहे.

 

दुसरीकडे राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार भाजपमधल्या इच्छुक आमदारांमुळे लांबणीवर पडल्याच्या चर्चा सुरू आहेत. मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी भाजपच्या इच्छुक आमदारांनी दिल्लीश्वरांकडे धाव घेतल्यामुळे राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार आणखी काही दिवस पुढे ढकलण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी सध्या बरेच भाजप आमदार दिल्लीत फिल्डिंग लावून आहेत, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्याचीही माहिती आहे. शिवसेनेतील मंत्रिपदाची यादी जवळपास निश्चित झाली आहे, मात्र भाजपमध्ये सर्व निर्णय दिल्लीतून आदेश आल्यानंतर होतात, त्यामुळे भाजपची यादी अद्याप फायनल न झाल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार काही दिवस पुढे ढकलला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने