Gautami Patil: आता गौतमीच्या आडनावावरून पेटणार नवा वाद; खरं आडनाव पाटील नाही?



ब्युरो टीम: गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि गोंधळ हे समीकरणच जणू झाले आहे. अलीकडेच एका कार्यक्रमात झालेल्या गोंधळावरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, ज्या गौतमी पाटीलची हवा तरुणाईमध्ये आहे, त्या गौतमीचे खरे आडनाव पाटील नाही, असा दावा करण्यात आला आहे.

राज्यातील एकही असा जिल्हा नसेल जिथे गौतमीचा कार्यक्रम होत नसेल. अगदी लग्न समारंभ, वाढदिवसानिमित्तही गौतमीला बोलावले जाते. गौतमीच्या डान्सला, तिच्या कार्यक्रमांना विरोध होत असला तरी तिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तिच्याविषयी छोट्यातली छोटी गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच गौतमीच्या आडनावाविषयी नवी माहिती समोर आली आहे.

गौतमीचे खरे आडनाव पाटील नाही

गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून, चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. गौतमीने पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जराड पाटील यांनी दिला आहे. गौतमीच्या पाटील या आडनावावरून पुण्यात एक बैठक घेण्यात आली. त्यामुळे आता गौतमीच्या आडनावावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, एकेकाळी ऑर्केस्ट्रामध्ये अदाकारा म्हणून काम करणारी गौतमी सर्वांना मागे टाकून पुढे गेली आहे. एखाद्या अभिनेत्रीलाही नसेल अशी गौतमी पाटीलची क्रेझ महाराष्ट्रभर निर्माण झाली आहे. तिच्या कार्यक्रमांना संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी होत आहे. गौतमी जिथे जाईल तिथे तिच्या कार्यक्रमाला प्रचंड प्रमाणात गर्दी होते. एखाद्या सिनेमात काम करणाऱ्या नटीच्या तोडीस तोड गौतमीची कमाई आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गौतमीच्या कार्यक्रमांना ग्रामीण भागात अधिक डिमांड आहे. त्यातही तिने कोल्हापूर आणि पुण्यात सर्वाधिक कार्यक्रम केले आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने