Khelo india: खेलो इंडियात आकाश गौंडची सुवर्ण किमया: कष्टकरी आईच्या चेहऱ्यावर हसू;



ब्युरो टीम:  घरची परिस्थिती साधारण. आई मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविते. आकाशही दोन सत्रात जीममध्ये काम करून तिला हातभार लावतो. अशा खडतर परिस्थितीत लातूरच्या आकाश श्रीनिवास गौंड याने वेटलिफ्टिंग खेळात वजनदार कामगिरी केली आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठात सुरू असलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये मंगळवारी सुवर्णपदक पटकावित आकाश ठेंगणे केले आहे.

शहरातील दयानंद कला महाविद्यालयात एम. ए. प्रथम वर्षात शिकणाऱ्या आकाश गौंडने नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत वेटलिफ्टिंग खेळात ५५ किलो वजनी गटात सुवर्ण किमया साधली आहे. जबरदस्त लिफ्टिंग व स्ट्राँग स्नॅच मारत विरोधी खेळाडूपेक्षा अधिक भार उचलत त्याने ही किमया केली आहे. स्नॅचमध्ये १०३ किलो तर क्लीन ॲण्ड जर्कमध्ये १२५ असे एकूण २२८ किलो वजन उचलत त्याने हे सुवर्णपदक पटकाविले आहे. त्यास प्रशिक्षक नीलेश जाधव, शुभम तोडकर, एनआयएस कोच परमज्योतसिंग सिद्धू, क्रीडा विभागप्रमुख प्रा. अशोक वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, विद्यापीठाचे क्रीडा संचालक विठ्ठलसिंह परिहार, प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड यांनी त्याचे कौतुक केले.

अखिल भारतीय स्पर्धेतही होते गोल्ड...

चंदीगड येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत २३४ किलो वजन उचलत त्याने काही दिवसांपूर्वीच सुवर्णपदक पटकाविले होते. यासह पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेतही त्याने रौप्यपदक पटकाविले होते. संघटनेमार्फत आयोजित खुल्या गटातही त्याने कांस्यपदक मिळविले आहे. घरची परिस्थिती साधारण असल्याने खुराकचा खर्च तो आपल्याच महाविद्यालयात असलेल्या जीमच्या पगारातून भागवत असतो. दयानंद शिक्षण संस्थाही त्याला खेळासाठी वेळोवेळी मदत करते.

आर्थिक प्रश्न सोडविला...

घरची परिस्थिती जेमतेम असल्याने आकाशला नेहमीच आर्थिक चणचण भासते. आई सरकारी दवाखान्यात कंत्राटी पद्धतीवर सिस्टर म्हणून नोकरीला होत्या. मात्र सध्या त्या मजुरी करून घरचा उदरनिर्वाह भागवितात. जीम ट्रेनर म्हणून मिळालेल्या पैशातून आकाश हातभार लावतो. खेलो इंडिया स्पर्धेला जाण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते. उसनवारी करीत त्याने आपली खेळाची हौस भागवत हे यश मिळविले.

सलग दुसरे सुवर्णपदक मिळविल्याचा आनंद...

चंदीगड येथे झालेल्या अखिल भारतीय स्पर्धेत विद्यापीठाला सुवर्णपदक मिळवून दिले होते. आता खेलो इंडिया स्पर्धेतही सुवर्णपदक मिळाले. त्यामुळे सलग दुसरे सुवर्णपदक मिळविल्याचा आनंद आहे. भविष्यात वेटलिफ्टिंग या खेळात लातूरचे नाव आणखीन उज्ज्वल करणार असल्याचे आकाशने 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने