Loksabha: नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार 'या' दिवशी होणार लोकार्पण; जाणून घ्या इमारतीची खास वैशिष्ट्ये



ब्युरो टीम: संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 28 मे 2023 रोजी नवीन संसद भवनाचे लोकार्पण करणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली आहे.

'एएनआय’च्या वृत्तानुसार, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांनी मोदींना नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे. या नवीन संसद भवनाचे बांधकाम पूर्ण झाले असून संसदेची नवीन इमारत आत्मनिर्भर भारताचे प्रतीक असेल, असे लोकसभेच्या सचिवालयाने सांगितले आहे.

संसदेच्या नवीन इमारतीची काय आहेत वैशिष्ट्ये?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 डिसेंबर 2020 रोजी नवीन संसद भवनाची पायाभरणी केली होती. कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे नेते, कॅबिनेट मंत्री आणि विविध देशांचे राजदूत उपस्थित होते. नवीन संसदेच्या इमारतीचे क्षेत्रफळ 64,500 चौरस मीटर एवढे आहे. सध्याच्या संसदेच्या इमारतीच्या बाजुलाच ही नवी इमारत बांधण्यात येत आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी साधारण 1 हजार 200 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

सेन्ट्रल व्हिस्टा विकास प्रकल्पांतर्गत नवीन संसद भवनाची इमारत उभारण्यात आली आहे. संयुक्त अधिवेशनात लोकसभा कक्ष 1272 सदस्यांना सामावून घेण्यास सक्षम असेल. उर्वरित इमारतीत मंत्र्यांची कार्यालये आणि समिती कक्षांसह 4 मजले असतील. त्रिकोणी आकाराच्या या नव्या संसद भवनाच्या इमारतीच्या बांधकामाला 15 जानेवारी 2021 मध्ये सुरुवात झाली होती. मात्र कोरोनामुळे ह्या इमारतीचे काम पूर्ण करण्यास विलंब झाला होता. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने