Money trap:मंत्रीपदासाठी भाजपचे ६ आमदार अडकले 'मनीट्रॅप'मध्ये; तोतया नड्डा आणि बोगस पीए



ब्युरो टीम: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा पीए असल्याचे सांगून भाजपच्या सहा आमदारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तोतया नड्डा आणि त्यांच्या बोगस पीएच्या सांगण्यावरून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद मिळविण्यासाठी तिघांनी या व्यक्तीला लाखो रुपये दिले.

मंत्रीपदासाठी 'मनी ट्रप'च्या या प्रकाराचे धागेदोरे गुजरातपर्यंत पोहोचले आहेत. यासंदर्भात नागपूर पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा गुजरातमधील मोरबी येथून नीरजसिंग राठोड याला ताब्यात घेतले.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इच्छुक आमदारांनी त्यासाठी लॉबिंगही सुरू केले आहे. त्यातच मंत्रीपद मिळवून देण्याच्या बहाण्याने नीरजसिंह राठोड या तोतयाने चक्क नड्डा यांचा पीए असल्याचे सांगून भाजप आमदारांना फसवले. भाजपचे नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांना फोन करून या तोतयाने लवकरच महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार असून तुम्हाला नगरविकास मंत्रीपद देण्यात येईल. त्यासाठी पक्ष निधी म्हणून 1 कोटी 67 लाख रुपयांची मागणी करत त्यांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला. कुंभारे यांनी आपल्याला फोन करणाऱ्याबाबत अधिक माहिती घेतली असता राठोड नावाची कुणीही व्यक्ती नड्डा यांचा पीए किंवा जवळची नाही हे स्पष्ट झाले. त्यानंतर कुंभारे यांनी नागपूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

आमदार विकास कुंभारे यांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा पोलिसांकडे सोपविला. पोलिसांनी मोबाईल क्रमांकाच्या आधारे नीरजचा शोध घेतला. नीरज हा अहमदाबाद येथील मोरबीत राहत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांचे पथक मोरबी येथे गेले आणि मंगळवारी रात्री नीरज याला अटक करून नागपूरला आणले. नीरजसिंह राठोड यांच्या प्राथमिक चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. विकास कुंभारे यांच्याप्रमाणे महाराष्ट्र आणि गोव्यातील आमदारांना मंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती पुढे आली आहे.

साथीदाराला केले नड्डा

नीरजसिंह राठोड यांनी आपणच खरेखुरे जे. पी. नड्डा यांचे पीए आहोत हे पटवून देण्यासाठी आपल्या एका साथीदाराला नड्डा केले. सापळय़ात सापडलेल्या आमदारांचे फोनवरून तोतया नड्डासोबत बोलणे करून द्यायचा. समोरची व्यक्ती नड्डा यांच्यासारखीच बोलत असल्याने फसगत होऊन काही आमदारांनी लाखोंची रक्कम तोतया नड्डा आणि पीएला दिल्याचीही माहिती आहे.

यांना फोनवरून मंत्रीपदाची ऑफर

नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांच्याशिवाय कामठीचे आमदार टेकचंद सावकर, हिंगोलीचे तानाजी मुटकुळे, बदनापूरचे नारायण कुचे व नंदुरबारचे आमदार राजेश पाडवी तसेच गोवा येथील प्रवीण आर्लेकर व नागालॅण्डचे बाशा मोवाचँग यांना मंत्रीपदाचे आमिष दाखवले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने