MPL: आयपीएल नंतर एमपीएल क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगणार; 'एमसीए'चे अध्यक्ष रोहित पवारांची घोषणा



ब्युरो टीम: महाराष्ट्रामध्ये आता आयपीएलच्या धरतीवर महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) टी-20 क्रिकेट स्पर्धेचा थरार बघायला मिळणार आहे. सहा सघांमधील ही स्पर्धा 15 ते 29 जूनदरम्यान पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहे.

या स्पर्धेत केदार जाधव, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी या आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह सुमारे 100 अव्वल दर्जाच्या क्रिकेटपटूंचा सहभाग असणार आहे.

'एमसीए'चे अध्यक्ष रोहित पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी एमसीएचे उपाध्यक्ष किरण सामंत, मानद सचिव शुभेंद्र भांडारकर, खजिनदार संजय बजाज आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, या स्पर्धेत अ, , क श्रेणीतील क्रिकेटपटूंचे लिलाव होतील व प्रत्येक संघात 19 वर्षांखालील दोन खेळाडू हे अनिवार्य असतील. जूनच्या पहिल्या आठवडय़ात क्रिकेटपटूंचे लिलाव होतील. या लिलावासाठी पुणे, संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर, बीड, धुळे, बुलढाणा, रत्नागिरी सिंधदुर्ग, रायगड व सोलापूर येथील 200 हून अधिक खेळाडूंनी नावे नोंदवल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. या स्पर्धेदरम्यान महिलांच्या तीन संघांमध्येही प्रायोगिक तत्त्वावर महिला एमपीएल होईल, असेही त्यांनी सांगितले.

विजेत्या संघांवर बक्षिसांचा वर्षाव

एमपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाला 50 लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल. याचबरोबर उपविजेता संघही 25 लाख रुपयांच्या बक्षिसाचा मानकरी ठरणार आहे. याचबरोबर खेळाडूंवर इतर बक्षिसांचाही वर्षाव होईल. आगामी काळात पुरुषांच्या 8 संघांमध्ये तर महिलांच्या 6 संघांमध्ये ही स्पर्धा रंगेल अशी माहितीही रोहित पवार यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने