Mulamutha: वृक्षतोडीचा चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात; महानगरपालिका घेणार जाहीर सुनावणी



ब्युरो टीम: महापालिकेकडून मुळा-मुठा नदीकाठ विकसन प्रकल्पासाठी सुमारे साडेसात हजार वृक्ष काढण्यात येणार आहेत. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समिती समोर हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावास पर्यावरण अभ्यास तसेच नागरिकांकडून विरोध करण्यात येत आहे.

त्यामुळे, या निर्णयाबाबत महापालिकेने हरकती मागविल्या होत्या. त्यावर सुमारे 150 हरकती प्राप्त झाल्या असून येत्या 8, 9 आणि 10 मे रोजी सलग तीन दिवस या हरकतींवर महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीकडून सुनावणी घेण्यात येणार आहे, याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय राज्यशासन घेणार असल्याची माहिती महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार यांनी दिली. महापालिकेने आता हा वृक्षतोडीचा चेंडू शासनाच्या कोर्टात टोलविला असल्याचे चित्र आहे.

महापालिकेने नदीकाठ सुधार प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. यासाठी नदीपात्रातील व पात्रालगतची झाडे तोडण्यात येणार आहेत. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या फेब्रुवारी 2023च्या कार्यपत्रिकेत नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या नावाखाली ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालय व शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयाने नदीकाठी नैसर्गिकरित्या वाढलेले हजारो देशी वृक्ष काढण्याचा अर्ज दाखल केला होता. हा प्रस्ताव प्राधिकरणाचे अध्यक्ष व महापालिकेचे आयुक्‍त तथा प्रशासक विक्रमकुमार यांच्याकडे सादर झाला.

या प्रस्तावाबाबतची जाहिरात व वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वृक्षप्रेमींनी महापालिकेला धारेवर धरले. यानंतर महापालिकेने यावर जाहीर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शासन काय निर्णय घेणार या वृक्षतोडीचा निर्णय अवलंबून असणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने