Nana Patole : आमचे उमेदवार परत करा ; नाना पटोलेची शिवसेना आणि राष्ट्रवादी कडे मागणी



ब्युरो टीम : एका बाजूला राज्यातील महाविकास आघाडी मजबूत असल्याचे सांगणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीने घेतलेले आमचे उमेदवार परत करावेत अशी मागणी एबीपी माझाशी बोलताना केली आहे.

महाडमधील स्नेहल जगताप) यांना उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटात घेऊन त्यांची उमेदवारी जाहीर केली तर सोलापूरमध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसचे अनेक नेत्यांना पक्षात घेणे सुरु केले आहे. आघाडीसाठी हे योग्य नसल्याची भूमिका मांडत नाना पटोले यांनी आमचे घेतलेले उमेदवार या पक्षांनी परत करावेत अशी मागणी महाविकास आघाडीच्या  बैठकीत करणार असल्याचे सांगितले. आज राष्ट्रवादीचे नाराज भगीरथ भालके यांची नाना पटोले यांच्याशी बंद खोलीत चर्चा झाली. याबाबत छेडले असता भालके यांच्या कुटुंबावर कोणतेही संकट येऊ दिले जाणार नसून काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.

'एकनाथ शिंदे कसे मुख्यमंत्री राहणार?'

या आठवड्यात राज्यात मोठ्या घटना घडणार असल्याचे सांगताना राज्य सरकार पडेल असे पटोले यांनी सांगितले. जरी सरकारकडे बहुमत असल्याचा दावा होत असला तरी मुख्यमंत्री अपात्र झाल्यावर सरकार कोसळणार असा दावा त्यांनी केला. विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांच्या म्हणण्यानुसार पुढील सहा महिने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर राहू शकतात, याची चिरफाड करत शेड्युल 10 प्रमाणे या निकालानंतर सरकार पडेल आणि मुख्यमंत्री सहा वर्षासाठी अपात्र ठरतील, अशावेळी ते पुढील सहा महिने कसे राहतील असा सवालही पटोले यांनी विचारला.

'जागावाटपावर फेरविचार होणे गरजेचे'

राज्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ वाटपावर पुनर्विचार महाविकास आघाडीमध्ये होणे गरजेचे असल्याचे सांगताना, पूर्वी ज्या पद्धतीने जागा वाटप झाले आणि त्यात पराभूत व्हावे लागले यावर पुन्हा विचार करावा लागेल असे पटोले यांनी सांगितले. नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या जागा वाटपाच्यावेळी शिवसेना हा आघाडीत नसल्याने आता आघाडीतील जागांची संख्या देखील कमी होणार आहे. पटोले यांनी केलेले वक्तव्य महाविकास आघाडीत नव्या वादाला तोंड फोडणार आहे.

सोलापूर लोकसभा सुशीलकुमार शिंदेंनी लढवावी, अशी पक्षाची भूमिका

सोलापूर लोकसभेसाठी पुन्हा सुशीलकुमार शिंदे यांनीच निवडणूक लढवावी अशी पक्षाची भूमिका असून ते ज्येष्ठ असल्याने त्यांनी नकार दिल्यास, त्यांनीच दिलेल्या उमेदवारावर विचार होईल असे त्यांनी सांगितले. संजय राऊत यांच्या प्रत्येक वक्तव्यावर आम्ही उत्तर देत नसतो, जेव्हा गरज पडते त्याचवेळी त्यांना बोलतो, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने