NCP: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर, समितीने एकमताने घेतला निर्णय



ब्युरो टीम: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यपदाचा दिलेला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या समितीने नामंजूर केला आहे. हा निर्णय पवारांना कळवण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर करताना अध्यक्षांच्या निवडीसाठी शरद पवार यांनी समितीची घोषणा केली होती. या समिती सदस्यांची शुक्रवारी म्हणजेच 5 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक पार पडली.

आज पार पडलेल्या बैठकीमध्ये शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला. या बैठकीत फक्त एकच ठराव मांडला जाणार असून या एकाच ठरावावर चर्चा होईल, अन्य कोणत्याही प्रस्तावावर चर्चा होणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे केरळ प्रदेशाध्यक्ष पी.सी.चाको यांनी सांगितले होते. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये ही बैठक पार पडली. बैठक सुरू असताना शरद पवार हे यशवंतराव चव्हाण सेंटर इथे होते. समितीने घेतलेल्या निर्णयानंतर शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये येणार असल्याचे सांगितले जात आहे.

शरद पवार काय निर्णय घेणार याकडे लक्ष

राजीनामा नामंजूर करत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पवार यांना कळवल्यानंतर त्यांची भूमिका काय असेल याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले तर मोठा पेच निर्माण होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होत चालले असून त्यांना समजावणं आणि शरद पवारांचेही मन मळवणं अशी दुहेरी कसरत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना करावी लागणार आहे.

या बैठकीमध्ये शरद पवारांनीच अध्यक्षपदी राहावे असा ठराव मांडणार असल्याचे चाको यांनी सांगितले. पवार यांनी अध्यक्षपदी राहावे असा ठराव मांडण्यात येणार असून , बैठकीत इतर कोणत्याही अन्य विषयावर चर्चा होणार नाही असे चाको यांनी सांगितले. या बैठकीसाठी पोहोचलेल्या छगन भुजबळ यांनी म्हटले की, आमच्या समितीने विविध पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नेते यांनी शरद पवार हेच अध्यक्षस्थानी हवे आहेत. त्यांनी तसा आग्रह धरला आहे. त्यामुळे आम्ही या बैठकीत तेच अध्यक्षपदी हवेत हाच ठराव मंजूर करणार आहोत.

 

कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांपैकी एका कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. शरद पवार यांनी आपला निर्णय बदलावा, त्यांनीच अध्यक्षपदी राहावे या मागणीसाठी या कार्यकर्त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. इतर कार्यकर्त्यांनी या कार्यकर्त्याला रोखल्यामुळे अनर्थ टळला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने