Pune University : पुणे विद्यापीठात नृत्य संकुल उभारणार!



ब्युरो टीम : 'भारतीय संस्कृतीत नृत्यकलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे नृत्यकलेचे संवर्धन आणि प्रचार प्रसारासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे नृत्य संकुल पुणे विद्यापीठात उभारणार असून, त्यासाठी राज्याचा उच्च शिक्षण विभाग, पुणे विद्यापीठ आणि जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल,' अशी घोषणा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. तसेच सवाई गंधर्वच्या धर्तीवर नृत्य रोहिणी महोत्सव हा कार्यक्रम नृत्यकलाकारांसाठी स्वतंत्र कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जाईल, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नृत्य गुरु मनिषा साठे यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मनेषा नृत्यालय कार्यक्रम तथा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नामदार पाटील बोलत होते. यावेळी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, नृत्य गुरु शमा भाटे, सुचेता चापेकर, प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या सह कला क्षेत्रातील विविध मान्यवर यांच्यासह शास्त्रीय नृत्यप्रेमी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे. अनेक सुप्रसिद्ध कलाकार या शहरात वास्तव्यास आहेत. नृत्य क्षेत्रातील अनेक दिग्गज देखील आपल्या कलेची जोपासना करतात. त्यामुळे नृत्यकला संवर्धनासाठी पुण्यात समर्पित व्यासपीठ असावे; अशी मागणी होत होती. त्याला अनुसरूनच पुणे विद्यापीठात नृत्य संकुल उभारण्यात येणार आहे. ते पुढे म्हणाले की, "या नृत्य संकुलासाठी पुणे विद्यापीठाने पाच एकर जागा प्रस्तावित केली आहे. तसेच यासाठी २२५ कोटी खर्च अपेक्षित असून, पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपये जिल्हा नियोजनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तर उर्वरित २०० कोटी राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून टप्प्या टप्प्याने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हे संकुल साकार झाल्यानंतर, देश-विदेशातील शास्त्रीय नृत्यकलेवर प्रेम करणाऱ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे."

पाटील पुढे म्हणाले की, "पुण्यात सवाई गंधर्व महोत्सवाचे एक वेगळेच महत्त्व आहे. देश विदेशातील अनेक शास्त्रीय गायक इथे आपली कला सादर करण्यासाठी आतूर असतात. त्याचप्रमाणे नृत्य कलाकारांना ही आपली कला सादर करण्यासाठी एक नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार असून, नृत्य रोहिणी महोत्सव यंदा डिसेंबर २०२३ पासून आयोजित करण्यात येणार आहे. त्यालाही नृत्यप्रेमींकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल," अशी अपेक्षा व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने