rahulshewale: राहुल शेवाळेनी सांगितली पुढील प्रक्रिया; भरत गोगावलेंना पुन्हा व्हीप नेमण्याची प्रक्रिया आजपासूनच सुरु करणार



ब्युरो टीम: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गटाने सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. न्यायालयाने काही निरीक्षणे, निर्णय ठाकरे गटाच्या बाजुने तर निकाल शिंदे गटाच्या बाजुने दिला आहे. यामुळे आता या गोष्टींवरून राज्यातील राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे.

१६ आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय अध्यक्षांकडे सोपविला असताना व्हीप मात्र शिवसेनेच्या ठाकरेंनी नेमलेल्या प्रतोदांचा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर एकनाथ शिंदे गटाने भरत गोगावले यांची शिवसेना प्रतोदपदी निवड केली होती. गोगावले प्रतोदपदी असल्याने त्यांना व्हिप जारी करण्याचा अधिकार शिंदेंच्या शिवसेनेने दिला होता. परंतु भरत गोगावले यांची निवड ही बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

यावर आता शिंदे गटाने हालचाली सुरु केल्या आहेत. भरत गोगावलेंना पुन्हा व्हीप नेमण्याची प्रक्रिया आजपासूनच सुरु करणार, असल्याची माहिती दिल्लीत असलेल्या शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे.

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निकालात म्हटलं की, शिंदे गटाचे समर्थक भरत गोगावले यांना शिवसेना पक्षाचा व्हीप म्हणून नियुक्त करण्याचा अध्यक्षांचा निर्णय बेकायदेशीर आहे. सुनील प्रभू आणि भरत गोगावले या दोन व्यक्तींपैकी कोणाला राजकीय पक्षाने अधिकृत व्हिप दिलेला आहे हे ओळखण्याचा अध्यक्षांनी प्रयत्न केला नाही. राजकीय पक्षाने नेमलेला व्हीपच अध्यक्षांनी ग्राह्य मानला पाहिजे. ३ जुलै २०२२ रोजी जेव्हा अध्यक्षांनी नवीन व्हिप नियुक्त केला तेव्हा विधीमंडळ पक्षात दोन गट निर्माण झाल्याची माहिती त्यांना होती असं कोर्टाने म्हटलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने