Ramdaasathvale: रामदास आठवले लोकसभा लढणार, मतदारसंघही ठरला!; एकनाथ शिंदेची झाली गोची?



ब्युरो टीम: लोकसभा निवडणुकीला आता एका वर्षापेक्षा कमी कालावधी उरला आहे, त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांकडून तयारीला सुरूवात झाली आहे. महाविकासआघाडीकडून तर बैठकांच्या सत्रालाही सुरूवात झाली आहे.

तर दुसरीकडे आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. आरपीआयने ज्या मतदारसंघावर दावा ठोकला आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या खासदाराचं टेन्शन वाढणार आहे. रामदास आठवले शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यात रिपाई आठवले गटाची पत्रकार परिषद पार पडली, याच पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा करण्यात आली आहे.

28 मे रोजी रिपाई आठवले पक्षाचं शिर्डीत राज्य अधिवेशन पार पडणार आहे. रिपाई आठवले पक्षाची नोंदणी झाल्यानंतर पहिलं अधिवेशन हे शिर्डीत घेणार असल्याची माहिती राज्य सह संघटक अशोक नागदेवे यांनी दिली आहे. यंदा रामदास आठवले हे पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आत्तापासूनच आठवले गटाकडून लोकसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे.

सदाशिव लोखंडेंचा पत्ता कट? शिर्डी मतदारसंघातून मागच्या दोन्ही टर्ममध्ये सदाशिव लोखंडे खासदार झाले आहेत. मागच्या वर्षी शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर सदाशिव लोखंडे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. आता रामदास आठवलेही भाजपसोबत असल्यामुळे सदाशिव लोखंडेंचा पत्ता कट होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. रामदास आठवलेंचं पुन्हा शिर्डी? रामदास आठवले यांनी 2009 साली शिर्डी लोकसभा निवडणूक लढली होती, पण भाऊसाहेब वाकचौरे यांनी रामदास आठवलेंचा पराभव केला होता. यानंतर रामदास आठवले यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडली आणि शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीमध्ये ते सहभागी झाले, यानंतर रामदास आठवले यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आणि त्यांना केंद्रीय मंत्रिपदही मिळालं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने