RSS: 'खरे मुस्लीम- चांगले नागरिक' अभियान; अल्पसंख्याक मतदारांना आपलंस करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघही मैदानात



ब्युरो टीम: देशात लोकसभा निवडणुकांसाठी केवळ एका वर्षांचा कालावधी राहिलेला आहे. भाजपासह सगळ्याच राजकीय पक्षांनी याची तयारी सुरु केलेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेला मुस्लीम राष्ट्रीय मंचानं अल्पसंख्याक मतदारांना आपलंस करण्यासाठी देशभरात अभियान राबवण्याची योजना तयार केली आहे. तर देशभरात एक राष्ट्र, एक झेंडा, एक राष्ट्रीय गीत असं अभियान रा. स्व. संघाच्या वतीनं राबवण्यात येणार आहे.

राष्ट्रीय मुस्लीम मंचाचं काय अभियान?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या राष्ट्रीय मुस्लीम मंचानं 'खरे मुस्लीम- चांगले नागरिक' या अभियानाची घोषणा केली आहे. हे अभियान संपूर्ण देशभरात राबवण्यात येणार असून अल्पसंख्याकांना जोडण्याचा प्रयत्न यातून करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. या अभियानासाठी ८ जून ते ११ जून या काळात मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक होणार असल्याचं सांगण्यात येतंय. यात संघाच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य इंद्रेश कुमार हेही सहभागी होणार आहेत. इंद्रेश कुमार हे राष्ट्रीय मुस्लीम मंचाचे संयोजकही आहेत.

उ. प्रदेशातही पार पडली होती अशी बैठक

२०२१ साली उ. प्रदेश विधानसभा निवडणुकांपूर्वी उ. प्रदेशात गाझियाबादमध्ये अशी एक बैठक पार पडली होती. त्या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित राहिले होते. यासह सहसरकार्यवाह कृष्णगोपाल आणि रामलाल हेही या बैठकीत उपस्थित होते. राष्ट्रीय मुस्लीम मंचाचे प्रवक्ते शाहिद सईद यांनी सांगितले की २०२४ च्या निवडणुकांपूर्वी खरे मुस्लीम, चांगले नागरिक हे कॅम्पेन राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने