sharadpawar: शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर आता दिल्लीतील धमाका केव्हा? राजकीय चर्चांना उधाण



ब्युरो टीम; गेल्या सप्टेंबर महिन्यात दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींमुळे अवघ्या ८ महिन्यांनंतर शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला.

दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये १० सप्टेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय अधिवेशन पार पडले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यात शरद पवार यांची पुढील पाच वर्षांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. विविध राज्यांच्या प्रदेश समित्यांनी शरद पवार यांच्याच नावाचे प्रस्ताव अध्यक्षपदासाठी पाठविले होते. यानुसार शरद पवार यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी शरद पवार यांचे नेतृत्व एकमेव पर्याय असल्याचा दावाही त्यावेळी अनेक नेत्यांनी भाषणांमध्ये केला होता.

दिल्ली प्रदेश काँग्रेसचा ठराव

शरद पवार यांच्या नेतृत्वातच काम करणार असल्याचे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी सांगितले. शरद पवार यांनी नवा अध्यक्ष निवडीसाठी गठित केलेल्या समितीमध्ये धीरज शर्मा यांचाही समावेश आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाशिवाय पक्षाची कल्पना करता येणार नाही. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही राजकारण सुरू केले आहे. यामुळे पवार यांनी नेतृत्व करावे, यासाठी दिल्ली प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ठराव करणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

दिल्लीतील धमाका केव्हा?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी दोन धमाके होणार असल्याचे भाकीत केले होते. यापैकी एक मुंबईत व दुसरा दिल्लीत होणार असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. मुंबईतील धमाका लोकांना आज समजला आता दिल्लीतील धमाका केव्हा होणार यावर चर्चा सुरू झाली आहे.

 

दादागिरीची चर्चा

शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर सभागृहात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली. या निर्णयाची ये गप रे, तुला जास्त कळते का, बसून घ्या, कळत नाही का, सुप्रिया, तू बोलू नको, भाऊ म्हणून अधिकारवाणीने सांगू शकतो, अशी अजित पवारांची सुरू असलेली दादागिरी चर्चेचा विषय ठरली होती. रडारड करणाऱ्या, घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांनाही अजित पवार यांनी सुनावले. त्यांच्या या त्राग्यातून पत्रकारही सुटले नाहीत. जेव्हा त्यांच्या नाराजीचा प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. अजित पवारांच्या या विधानाचे व्हिडीओ नंतर व्हायरल होत होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने