Sushilkumarshinde: सुशीलकुमार शिंदे ठरवणार तोच होणार कर्नाटकाचा नवा मुख्यमंत्री? पक्षाने निरीक्षक म्हणून पाठवले




ब्युरो टीम: कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १३६ जागा जिंकून ऐतिहासिक यश मिळविले. आता नवा मुख्यमंत्री कोण होणार, याची उत्सुकता वाढली असताना हा तिढा सोडविण्यासाठी पक्ष निरीक्षक म्हणून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

त्यानुसार रविवारी एका विशेष विमानाने शिंदे बंगळुरूला रवाना झाले.

कर्नाटकात काँग्रेसने धवल यश मिळविल्यानंतर तेथे सत्तास्थापनेला वेग आला आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे दोघे नेते मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर कर्नाटकासाठी पक्षनिरीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या जबाबदारी संदर्भात शिंदे यांनी दुजोरा दिला आहे. नवी दिल्लीहून पक्षश्रेष्ठींचा सुशीलकुमार शिंदे यांना पक्ष निरीक्षक म्हणून तत्काळ रवाना होण्यासाठी आदेश प्राप्त झाला. त्यानंतर लगेचच त्यांना बंगळुरूला नेण्यासाठी विशेष विमानही सोलापुरात आले. शिंदे हे या विशेष विमानाने बंगळुरूकडे रवाना झाले.

मुख्यमंत्रिपदाची निवड प्रक्रिया होईपर्यंत शिंदे हे बंगळुरूमध्ये ठाण मांडून बसणार आहेत. पक्ष निरीक्षकपदाची जबाबदारी शिंदे यांच्यावर सोपविण्यात आल्याचे समजताच सात रस्त्यावरील जनवात्सल्य निवासस्थानी स्थानिक प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी गर्दी करून शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने