Tesla Project : 'जे हवं ते देऊ'; महाराष्ट्रात प्रकल्प सुरु करा ; शिंदे- फडणवीस सरकारची टेस्ला ला मोठी ऑफर



ब्युरो टीम: राज्याबाहेर एकामागून एक गेलेऱ्या प्रकल्पांवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना निशाण्यावर धरलं आहे. राज्यातील प्रस्तावित उद्योग गेल्या काही महिन्यांपासून गुजरात, मध्य प्रदेशात गेले आहेत.

यावरुन विरोधकांनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावरुन आता प्रत्युत्तर देण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. राज्यात उद्योग आणण्यासाठी सरकारने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. टेस्ला प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु झाले आहेत. टेस्ला प्रकल्पासाठी ज्या हव्या त्या सगळ्या सुविधा देण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने केली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे.

टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क हे टेस्लाच्या भारतातील कारखान्यासाठी जागा शोधत असल्याची माहिती समोर आली आहे. या वर्षाच्या अखेरीस मस्क हे भारतातील एका राज्यात टेस्लाचा कारखाना सुरु करण्याची शक्यता आहे. मंगळवारी एका मुलाखतीदरम्यान वॉल स्ट्रीट जर्नलच्या थोरॉल्ड बार्करने इलॉन मस्क यांना विचारले की टेस्लाला नवीन कारखान्यासाठी भारतात स्वारस्य आहे का. त्यावर प्रत्युत्तरात मस्क यांनी सकारात्मक असे उत्तर दिलं होते. अशातच टेस्लाच्या काही अधिकाऱ्यांनी नवी दिल्लीत दोन दिवस भारतीय अधिकाऱ्यांची भेट घेतल्याची बातमी आली होती.

त्यानंतर सर्वच राज्यांनी आपल्याकडे प्रकल्प खेचण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच महाराष्ट्रानेही प्रकल्पासाठी हवे ते देऊ अशीच ऑफर टेस्लाला कंपनीला दिली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. "ज्या ठिकाणी ते जागा मागतील त्या ठिकाणी आम्ही जागा देऊ. उद्योग आणणे आणि उद्योगांना ताकद देणे हेच शिंदे-फडणवीस सरकारची प्राथमिकता आहे. ज्या ठिकाणी महाराष्ट्रात ते जागा मागतील त्याठिकाणी चांगल्या सवलतींसह आम्ही त्यांना जागा देऊ," असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

जयंत पाटील यांनीही दिली होती ऑफर

टेस्लाला निमंत्रण देताना महाराष्ट्राचे माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मस्क यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले होते. जयंत पाटील यांनी यासंदर्भात ट्विट केले होते. "महाराष्ट्र हे भारतातील सर्वात प्रगतीशील राज्यांपैकी एक आहे. तुमचा प्लांट भारतात उभारण्यासाठी आम्ही तुम्हाला महाराष्ट्राकडून आवश्यक ते सर्व सहकार्य देऊ," असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, टेस्लाचे संस्थापक मस्क यांनी गेल्या वर्षी सांगितले होते की, कंपनी, भारतात आपली वाहने विकण्यासाठी आयात शुल्क कमी करण्याची मागणी करत होती, ती सुविधा मिळाल्याशिवाय आपली उत्पादने तयार करणार नाही. टेस्लाने भारत सरकारशी संपर्क साधला आहे. कंपनीने भारत सरकारला बैठक घेण्याची विनंती केल्याची माहिती भारत सरकारच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने