UPSC Result : यूपीएससीत ठाण्याची कश्मिरा संखे राज्यात पहिली! पहिल्या दहा क्रमांकामध्ये सहा मुली



ब्युरो टीम; केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा 2022 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. या वर्षी देशासह महाराष्ट्रातही मुलींचा झेंडा फडकला असून, इशिता किशोरने देशात पहिला क्रमांक मळवला आहे.

विशेष म्हणजे देशातील पहिल्या दहा उमेदवारांमध्ये सहा मुली, तर चार मुले आहेत. पहिल्या चार क्रमांकांवर मुलींनी बाजी मारली आहे. पाचवा क्रमांक मयूर हजारिकाने पटकावला आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांनीही यंदा परीक्षेत चमकदार कामगिरी केली असून ठाण्याच्या डॉ. कश्मिरा संखेने महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान मिळविला. डॉ. कश्मिरा देशात 25व्या स्थानी झळकल्या आहेत. दरम्यान, यूपीएससीत या वर्षीही मराठी झेंडा फडकला आहे.

भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय परकीय सेवा (आयएफएस), भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) केंद्रीय सेवा गट '', गट '' अशा पदांसाठी नागरी सेवा परीक्षा 2022 घेण्यात आली होती. अंतिम निकालात एकूण 933 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 345 विद्यार्थी यामध्ये सामान्य (खुला) गटातील आहेत. आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) 99, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) - 263, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) - 154, अनुसूचित जमाती प्रवर्गातून - 72 उमेदवारांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 178 उमेदवारांची आरक्षित सूची तयार केली आहे. तसेच आयएएस पदावर निवड करण्यासाठी 180 विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. तर आयएफएससाठी 38, आयपीएस 200, केंद्रीय सेवा गट '' साठी 473 आणि गट '' सेवांसाठी 131 पदे भरण्यात आली आहेत. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गुणपत्रिका 15 दिवसांनी मिळणार आहे.

दरम्यान, नागरी सेवा पूर्व परीक्षा 5 जून रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी 11 लाख 35 हजार 697 उमेदवारांनी अर्ज भरला होता. त्यापैकी 5 लाख 73 हजार 735 उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यापैकी 13 हजार 90 विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले. ही परीक्षा 16 ते 25 सप्टेंबर दरम्यान झाली. या परीक्षेतून मुलाखतीसाठी 2 हजार 529 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांच्या 18 मेपर्यंत मुलाखती पार पडल्या. त्यानंतर पाच दिवसांतच अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.

वडील चहाच्या टपरीवर, आई विडी कामगार… मंगेश खिलारीचे डोळे दीपवणारे यश

 

मंगेश खिलारी याने यूपीएससी परीक्षेत 396वा रँक मिळविला असून, त्याला युनिक अपॅडमीच्या प्रवीण जाधव सरांचे मार्गदर्शन मिळाले. आपल्या यशाबद्दल सांगताना मंगेश म्हणाला, माझे शालेय शिक्षण नगर जिह्यातील संगमनेर तालुक्यातील सुकेवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. लहानपणापासून घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे शिक्षण घेऊन मोठं होण्याचं स्वप्न मी बघितलं. आई विडी कामगार आणि वडील चहाच्या टपरीवर काम करतात. मी ही शाळा संपली की जो वेळ मिळायचा तेव्हा वडिलांना मदत करायचो. मी संगमनेरचा आहे. आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणाची फी परवडणार नव्हती. बीए राज्यशास्त्र विषय घेऊन पुढे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. हा माझा तिसरा अटेंप्ट होता. 396वी रँक मिळाली याचा आनंद झाला. आईवडिलांची प्रेरणा आणि त्यांचे कष्ट मी जवळून पहिले. संयम, आत्मविश्वास, चिकाटीने प्रयत्न केले तर यश मिळते म्हणून प्रयत्न करत राहायचे असंच मी यशाचं गमक सांगेन. दरम्यान, मंगेशच्या या डोळे दीपवणाऱ्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यूपीएससी मार्किंग योजना

उत्तीर्ण होण्यासाठी यूपीएससीची प्राथमिक परीक्षा आवश्यक आहे. एकूण 1750 गुणांची लेखी परीक्षा असते. यूपीएससी सीएई लेखी परीक्षा (मुख्य) परीक्षेत एकूण 9 पेपर असतात परंतु त्यापैकी केवळ 7 पेपर्समध्ये मिळालेले गुण अंतिम गुणवत्ता क्रमवारीत समाविष्ट केले जातात. एकूण 250 गुणांचे 7 पेपर आहेत. ज्याच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते (यूपीएससी मार्ंकग स्कीम). आयएएस मुलाखत 275 गुणांची दिल्लीतील UPSC कार्यालयात घेतली जाते.

सारथीच्या 17 विद्यार्थ्यांनी मिळविले यश

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे संस्थेमार्फत मुख्य परीक्षा व मुलाखतीकरिता 39 विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य करण्यात आले होते. 39 विद्यार्थ्यांपैकी 17 विद्यार्थ्यांची यूपीएससीच्या 2022 च्या अंतिम यादीत निवड झाली आहे, अशी माहिती अशोक काकडे यांनी कळविले आहे.

देशातील टॉप 10 उमेदवार

1. इशिता किशोर

2. गरिमा लोहिया

3. उमा हरति एन

4. स्मृति मिश्रा

5. मयूर हजारिका

6. गहना नव्या जेम्स

7. वसीम अहमद

8. अनिरुद्ध यादव

9. कनिका गोयल

10. राहुल श्रीवास्तव

यशस्वी विद्यार्थी

जरड प्रतीक अनिल (पुणे), ऋषिकेश हनमंत शिंदे (सांगली), अर्पिता अशोक ठुबे (ठाणे), सोहम सुनील मांढरे (पुणे), मंगेश पिराजी खिलारी (नगर) सागर यशवंत खर्डे (नगर), आशिष अशोक पाटील (कोल्हापूर), शशिकांत दत्तात्रय नरवाडे (धाराशीव), स्वप्नील चंद्रकांत बागल (हिंगोली), लोकेश मनोहर पाटील (जळगाव), प्रतीक्षा संजय कदम (सातारा), मानसी नानाभाऊ साकोरे (पुणे), करण नरेंद्र मोरे (सातारा), शिवम सुनील बुरघाटे (अमरावती), शिवहार चक्रधर मोरे (नांदेड), राजश्री शांताराम देशमुख (नगर), महारुद्र जगन्नाथ भोर (नगर)

मराठी पाऊल पडते पुढे…

लोकेश पाटील (552), प्रतीक्षा कदम (560), मानसी साकोरे (563), जितेंद्र किर (569), अमित उंदिरवादेने (581),, श्रुती कोकाटे (608), अनुराग घुगे (624), अक्षय नेर्ले (635), प्रतीक कोरडे (638), करण मोरे (648), राहुल अत्राम (663), केतकी बोरकर (666), सागर देठे (691), शिवहार मोरे (693), सिद्धार्थ भांगे (700), स्वप्नील डोंगरे (707), राजश्री देशमुख (719), अतुल ढाकणे (737), महारूद्र भोर (750), अंकीत पाटील (762), विवेक सोनवणे (792), संकेत कांबळे (810), निखिल कांबळे (816), पूजा खेडकर (821), गौरव अहिरराव (828), शृती शिरोटे (859), तुषार पवार (861), दयानंद तेंडुलकर (902), वैशाली धांडे (908)

 

मराठी पाऊल पडते पुढे…

यंदाच्या यूपीएससी निकालात तब्बल 50वर मराठी उमेदवार चमकले आहेत. हे सर्व उमेदवार आता आयएएस, आयपीएस किंवा इतर सिव्हिल सर्व्हिस अधिकारी होणार आहेत. महाराष्ट्रातील यशस्वी उमेदवारांची यादी - (कंसात ऑल इंडिया रँक)

कश्मिरा संखे (25) रिचा कुलकर्णी (54) दिक्षिता जोशी (58) वसंत दाभोळकर (76) प्रतीक जराड(122) जान्हवी साठे (127) गौरव कायंदे-पाटील (146) ऋषिकेश शिंदे (183) अमर राऊत (277) अभिषेक दुधाळ (278) श्रुतिषा पाताडे (281) स्वप्नील पवार (287) अनिकेत हिरडे (349) संकेत गरुड (370) ओमकार गुंडगे (380) परमानंद दराडे (393) मंगेश खिलारी (396) सागर खराडे (445) आशीष पाटील (470) शशिकांत नरवडे (493) प्रतिभा मेश्राम (526) शुभांगी केकाण (530) प्रशांत डगळे (535).

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने