Ajit pawar : नामकरणाचे स्वागतच.. पण कोठेतरी बारामतीचा उल्लेख असावा - अजित पवार

 


ब्युरो टीम : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव बारामती शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाला देण्यात आले याचे सर्वसामान्य बारामतीकरांनी  तसेच लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सुद्धा स्वागतच केले. मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव वैद्यकिय महाविद्यालयाला देत असताना त्यामध्ये कोठेतरी बारामतीचा उल्लेख असावा अशी भावना अनेकांनी मला बोलून दाखवली आहे. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा मला मनापासून आनंदच आहे, असे मत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले

बारामती येथे विकास कामांचा आढावा तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी अजित पवार रविवारी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांंशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, बारामती येथील वैद्यकिय महाविद्यालयाच्या पायाभरणीपासून आजपर्यंतच्या कामाचा मी साक्षीदार आहे. वैद्यकिय महाविद्यालयाच्या निधीसाठी मी काय केले हे माझं मला माहिती. ते माझे कर्तव्य होते. त्या कर्तव्य भावनेने मी केले. आता तेथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे नाव दिले आहे. पुणे विद्यापिठाला देखील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ असे नाव दिले आहे. आता येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारामती शासकिय वैद्यकिय महाविद्यालय असे नाव ते देणार का? आणखी कसे देणार हे मला माहिती नाही. येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे नाव द्यावेच मात्र त्यामध्ये कुठेतरी बारामतीचा उल्लेख असावा, अशी काही बारामतीकरांनी मला विनंती केली आहे. हा अधिकार राज्य शासनाचा आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने