ब्युरो टीम : अजित पवार व त्यांच्या समर्थकांना गेल्या काही वर्षांपासून पक्ष संघटनेत डावलण्यात येत असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. त्यातच, अजित पवार हे विरोधी पक्षनेते म्हणून फारसे आक्रमक होत नाहीत, अशा चर्चा पक्षात अजित पवार विरोधी गटाकडून उघडपणे केल्या जात होत्या. मुख्य म्हणजे अजित पवार विरोधी गटातीलही अनेकजण सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी अत्यंत सौहार्दाचे संबंध ठेवून स्वतः केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर येणार नाही, याची काळजी घेत आहेत, असेही उघडपणे बोलले जाऊ लागले आहे. राष्ट्रवादीत अजित पवार समर्थकांची कोंडी करण्यासाठी शीर्षस्थ नेतृत्वाचे कान भरणे अव्याहतपणे सुरू होते, असे अजितदादा समर्थकांचे म्हणणे आहे.
अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आक्रमक भाषण केले. त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांसमोर आपल्या मनातील सगळी खदखद बोलून दाखवली. अजित पवारांचा हा आक्रमक अवतार पाहता त्यांनी जयंत पाटील व पक्षातील अन्य काही नेत्यांना त्यांनी धक्का दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
‘मला विरोधी पक्षनेतेपदात कधीच रस नव्हता. पक्षातील आमदारांच्या स्वाक्षऱ्या, नेतेमंडळींच्या आग्रहाखातर मी विरोधी पक्षनेता झालो. वर्षभर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळली आहे. ते सांभाळत असताना मी कडक वागत नाही, असे काहींचे म्हणणे आहे. आता कडक वागायचे म्हणजे त्यांची गचांडी धरायची का? त्यामुळे विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदारीतून मला मुक्त केल्यानंतर संघटनेची कोणतीही जबाबदारी द्यावी. त्या पदाला योग्य न्याय मी मिळवून देईन. अर्थात हा नेतेमंडळींचा अधिकार आहे. बाकी अनेकजण वेगवेगळ्या इच्छा व्यक्त करतात. मी आज माझी इच्छा व्यक्त केली आहे. आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी पार पाडलेली आहे’, असे अजित पवार म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा