ब्युरो टीम - बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने पवारांना फार मोठा धक्का देत थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव बदलले.यातून भाजपने राष्ट्रवादीबरोबर आमचे कोणतेही साटेलोटे नसून आम्ही 2024ची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहोत, असे संकेत देत त्या दिशेने वाटचाल सुरू केलेली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथे बारामतीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती व अहमदनगरचे अहिल्यादेवीनगर नामकरणाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली. संपूर्ण महाराष्ट्रसह बारामती परिसरात व विशेषतः बहुसंख्येने असलेल्या धनगर समाजामध्ये त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे.
भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. गोविंद देवकाते यांनी गेल्या सहा महिन्यांपासून मेडिकल कॉलेजचे नामांतरणासाठी पाठपुरावा करून वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन व माजी मंत्री राम शिंदे या दोघांबरोबर संपर्क ठेवून नामांतरणाचे कार्य पूर्ण केले. त्याची कागदपत्रे नामांतरण झाल्यावर सोशल मीडियावर शेअरही केली. यामुळे संपूर्ण बारामतीत खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष
अहिल्यादेवींच्या नावाने आम्हाला आनंद झाला आहे, असे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी नमूद केले आहे. त्याचाच परिणाम म्हणून शनिवार (दि. 24), रविवारी (दि. 25) बारामतीमध्ये अहिल्यादेवी यांचा जयंती निमित्ताने वातावरण तापलेले आहे. रविवारी 25 तारखेला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, शरद पवार, अजित पवार उपस्थित राहून भाजपाच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष समाजोपयोगी काय घोषणा करणार, याच्याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.
शनिवारी भाजपचा कार्यक्रम
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन व आमदार राम शिंदे यांच्या माध्यमातून शनिवारी (दि. 24) मार्गदर्शन केले जाणार आहे. एकूणच बारामतीतले वातावरण ढवळून निघणार आहे, हे मात्र निश्चित!
टिप्पणी पोस्ट करा