ब्युरो टीम : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील स्व. आमदार भारत भालके यांचे पुत्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी हैदराबादकडे रवाना झाले आहेत. केसीआर यांनी भगीरथ भालके यांच्यासाठी पुण्याला खास विमान पाठवले होते. बुधवारी सकाळी ते खास विमानाने सहपरिवार पुण्याहून हैदराबादकडे रवाना झाले. त्यामुळे ते लवकरच चंद्रशेखर राव यांच्या पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चा पंढरपूर, मंगळवेढ्यात रंगल्या आहेत.
दरम्यान, भगीरथ भालके हे २०२४ मध्ये भारत राष्ट्र समितीकडून विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राव यांच्यासोबतच्या या भेटीत काय काय ठरते, यावर बरंच काही अवलंबून आहे. खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांना भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयातून पक्षप्रवेशासाठी संपर्क साधण्यात आला होता. मात्र, भालके यांनी आजपर्यंत ‘वेट ॲंड वॉच’ची भूमिका घेतली होती. मात्र, ते चार्टर्ड विमानाने आज, सकाळी हैदराबादला रवाना झाले. त्यांच्यासमवेत आई जयश्री भालके, पत्नी प्रणिता भालके, भाऊ व्यंकट भालके, रूद्रतेज भालके, शौर्यतेज भालके यांच्यासह माजी आमदार शंकर धोंगडे, मारूती जाधव आदीजण तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.
हैदराबादचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी खास चार्टर्ड विमान आपल्यासाठी पाठविले आहे. आमची बैठक आज बुधवारी दुपारच्या दरम्यान नियोजित आहे. त्या बैठकीत चर्चा केल्यानंतर परत येऊन जवळचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन पुढील रणनीती निश्चित केली जाणार आहे.भगीरथ भालके, राष्ट्रवादी नेते, पंढरपूर
टिप्पणी पोस्ट करा