Blog : Blog विश्व

  


ब्युरो टीम : तुमचे विचार, मत, तुमच्या कल्पना ह्या लिखीत स्वरूपात इंटरनेटच्या साह्याने जगासमोर मांडण्यासाठी ब्लॉग हा उपयुक्त प्लॅटफॉर्म आहे. थोडक्यात काय तर ब्लॉगला इंटरनेटवरील डायरी किंवा रोजनिशी असे देखील आपण म्हणू शकतो.

इंटरनेटच्या व ब्लॉगच्या मदतीने आपण जगातील कोणतीही मौल्यवान माहिती  केंव्हाही, कधीही व अगदी कमी वेळात मिळवू शकतो.

मित्रांनो Blog या शब्दाची फोड पुढीलप्रमाणे होते, Blog = Web + Log.

🔰 Blogger कोणाला म्हटले जाते ?

जी व्यक्ती विविध प्रकारचे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय प्रकारचे लेख लिहून त्या लेखाला ब्लॉगच्या स्वरूपात इंटरनेट वर पब्लिश करते आणि त्या ब्लॉगला नियंत्रित करण्याचे काम करते अश्या व्यक्तीला आपण Blogger असे म्हणतो.जसे Youtube वर व्हिडिओ निर्मिती करणार्‍यास "Youtuber" म्हणतात तसेच Blog नियंत्रण करणार्‍या व्यक्तिस "Blogger" असे म्हणतात.

तसेच ब्लॉग लिहण्याच्या प्रक्रियेला Blogging म्हणतात आणि ब्लॉगवर लिहल्या जाणार्‍या प्रत्येक गोष्टीला/नोंदीला/विचाराला Blog Post असे म्हणतात.

एखाद्या शैक्षणिक पुस्तकाची, मासिकाची व वर्तमानपत्रीची पोहचं ही केवळ काही भागापुरती मर्यादीत राहते पण ब्लॉगच्या माध्यमातून लिहलेली एखादी शैक्षणिक माहिती ही जगात कोठेही, कधीही, केंव्हाही विनामूल्य मिळू शकते.

ब्लॉगच्या मदतीने विविध महान आणि लोकप्रिय व्यक्तींचे मते, विचार त्यांच्याबद्दलची माहिती,  जगातील प्रसिध्द पर्यटनस्थळांची माहिती तसेच चालू घडामोडीवरील बातम्या, ऑडिओ, व्हिडिओ,ध्वनिचित्रफिती, PDF,  इत्यादी प्रकारची सर्वच माहिती ब्लॉग च्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने शेअर केली जाते.

🔰 ब्लॉग तयार करण्यासाठी खालीलप्रमाणे काही महत्वाची गोष्टी लागतात. 

1) Domain & hosting

Domain म्हणजे ब्लॉग ज्या नावाने ओळखला जातो असे नाव (blog साठी नाव जसे .com .in इत्यादीमध्ये)

ब्लॉगचे डोमेन हे फक्त एक नाव नसून ब्लॉगची ओळख आहे, मित्रांनो शक्यतो डोमेन नेम हे छोटे असावे, युनिक असावे, घेण्यापूर्वी गुगलवर सर्च करून त्याचा इतिहास पहावा, स्वस्त डोमेन कोणत्या वेबसाईटला भेटते ते पहावे, डोमेन नेम बोलण्यास व टाईप करण्यास सोपे असावे. Domain मध्ये .in हे सहसा भारतीय वेबसाईट म्हणून ओळखले जाते तर .com ही Word wide साठी ओळखले जाते.

    तसेच hosting म्हणजे थोडक्यात ब्लाॅग पोस्ट लिहीण्यासाठी जागा (Text, PDF Image,Video साठी जागा) होस्टींग देणार्‍या वेगवेगळ्या कंपन्या आहेत जसे गुगलची blogger.com, Bluehost, hostinger, Go daddy, इत्यादी.पण आपणास विनामूल्य किंमतीत ह्या सुविधा हव्या असतील तर आपण Blogger ची मदत घेऊ शकतो.

Blogger(Google) च्या मदतीने आपणास फ्रिमध्ये होस्टींग मिळते व डोमेनसाठी मात्र मी तुम्हाला Go daddy  वापरण्याचा आग्रह करेल कारण तेथून आपल्या ब्लाॅगसाठी खूप कमी किंमतीत डोमेन मिळते. ब्लॉग निर्मितीसाठी hosting व Domain या दोन महत्वाच्या गोष्टी लागतात.

2) ब्लॉगची थीम/ Theme

Blog साठी डोमेन व होस्टींग नंतर महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे ब्लॉगची थीम, म्हणजे तुमच्या युजरला तुमचा ब्लॉग कसा दिसेल हे theme/template वरून ठरते.

हे सर्व झाल्यानंतर ब्लॉगमध्ये काही महत्वपूर्ण सेटींग आवश्यक असतात, उदाहरणार्थ आपण लिहलेली एखादी ब्लॉग पोस्ट गुगलमध्ये रँक /सर्चमध्ये आणायची असेल तर SEO(Search Engine Optimization ) करणे महत्वाचे असते.याद्वारे युजरला जगात आपली पोस्ट कुठेही पाहणे सोपे जाते. थोडक्यात काय तर जी पोस्ट आपण लिहीली आहे त्या पोस्टला दिलेले टायटल, टॅग व वर्णन , लावलेली image , कॅप्शन हे महत्वपूर्ण भूमिका बजावतात.


ब्लॉग सुरू करताना कोणत्या गोष्टी आवश्यक असतात ?

➡️ आपणास ज्या विषयामध्ये ब्लॉग तयार करायचा आहे त्या विषयाची आवड असली पाहिजे आणि संबंधित विषयाचा गाढा अभ्यास असायला हवा.

➡️ ब्लॉग लिहीताना भाषा ही महत्त्वाची आहे ज्या भाषेमध्ये आपणाला लिहायला सोपे जाते, त्या भाषेत आपण ब्लॉग सुरू करायला हवा.

➡️ ब्लॉगसाठी डोमेन & होस्टींगची आवश्यकता असते.

➡️ ब्लॉगला सजवण्यासाठी एका आकर्षक थीमची/टेम्पलेटची आवश्यकता असते.

➡️ ब्लॉग सुरू करण्या संबंधी बेसिक माहिती आपणास YouTube व Google वर विनामूल्य मिळू शकते.

➡️ प्रथमतः तुम्ही हे ठरवा की तुम्हाला तुमचा ब्लॉग Blogger.com वर करायचा आहे की Wordpress.com वर.

➡️ शक्यतो आपल्या ब्लॉगचे नाव हे दिलेल्या विषयाशी जुळणारे असावे व त्याच नावाने आपण डोमेन विकत घ्यावे तसेच डोमेन नेम छोटे असावे.

🔰 ब्लॉगिंग तुम्ही अनेक महत्वपूर्ण विषयावर करू शकता जसे,

1)शिक्षण 2)आरोग्य 3)अवकाश ज्ञान 4)सौंदर्य 5)विज्ञान 6)मनोरंजन 7) राजकारण 8)कूकींग    9) फूड 10)फायनान्स 11)व्यवसाय 12)फोटोग्राफी 13)क्रिकेट व इतर खेळ 14)चालू घडामोडी 15)फिटनेस 16)डिजीटल मार्केटींग

1) शिक्षण विषयक ब्लॉग :-

सदरील विषयामध्ये आपण विद्यार्थी, पालक व शिक्षक हीत लक्षात घेता विविध शैक्षणिक लेख, ऑनलाईन टेस्ट, व्हिडीओच्या लिंक्स, शैक्षणिक शासन निर्णय, Smart PdF, Educationl images इत्यादी स्वरुपात माहिती देऊ शकतो. तसेच comment च्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षक-पालक यांच्यात आंतरक्रिया पण घडून येते.

2) हेल्थ / आरोग्यासंबंधी ब्लॉग :-

ह्या विषयावर ब्लॉग लिहीताना आपणाला मेडीकल फिल्ड विषयी पूर्ण माहिती असावी, अर्धवट ज्ञान असून उपयोग नाही. त्यासाठी आपणास ऑर्थोपेडिक, मेडिसिन, पेथोलॉजी, आयुर्वेदिक फिजिओलॉजी, इत्यादी संबंधी माहिती असणे आवश्यक आहे.यासाठी आपण MBBS, फिजियोथेरेपी, डेंटल, इत्यादी क्षेत्रांतील तज्ञ लोकांची मदत घेऊ शकतो. तसेच काही संदर्भ साहित्यांचा वापर करू शकतो.

3) अवकाश ज्ञान संबंधी ब्लॉग :-

अवकाश ज्ञान ब्लॉग लिहीताना यामध्ये चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, पृथ्वी, सूर्य, दूर्बिण, आपली आकाशगंगा, सर्व ग्रहांची माहिती, मंगळयान, कृष्ण विवर (Black hole),  अवकाशवीर(Astronaut), अंतरिक्षयान(Spaceship), अंतराळ स्थानक(Space station ), तारकासमूह() याबाबत माहिती फोटो/ व्हिडिओसह देणे आवश्यक आहे.

4) ब्युटी/सौंदर्य विषयी ब्लॉग :-

सौंदर्या संबंधी ब्लॉग लिहिताना आपणास एक काळजी घ्यावा लागेल की ब्लॉगची थीम  किंवा टेम्प्लेट सुंदर दिसायला हवे, त्याच्यातील चित्र, रंग आणि इतर गोष्टी अनुकूल असाव्यात.

5) विज्ञान विषयक ब्लॉग :-

यामध्ये प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र,  जैव विविधता, जैव तंत्रज्ञान, मानवी मेंदूचा अभ्यास , शरीरशास्त्र इत्यादी बाबत माहिती फोटो/ व्हिडिओसह देणे आवश्यक आहे.

6) मनोरंजन विषयक ब्लॉग :-

मित्रांनो मनोरंजन हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तुम्ही या विषयावर ब्लॉग लिहू शकता. यामध्ये मनोरंजन जगातील चालू घडामोडींविषयी माहिती तुमच्या वाचकांना उपलब्ध करुन देऊ शकता. यात तुम्ही खेळ, चित्रपट, टि.व्ही. सिरियल, वेब सिरिज, मोबाईल व्हिडिओ गेमविषयी लिहू शकता.

7) राजकीय विषयक ब्लॉग :- 

हा सुद्धा अनेक वाचकांचा आवडीचा विषय आहे. यामध्ये तुम्ही राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडींविषयी माहिती लिहू शकता. माहिती देताना कुठलाही सामाजिक वाद निर्माण होणार नाही, समाजमने दुखावली जाणार नाहीत याचे मात्र तारतम्य बाळगा. आपणास फक्त राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडींची माहिती वाचकांपर्यंत पोहचवायची आहे.

8) कुकींग विषयक ब्लॉग :-

चांगले अन्न खाण्याची इच्छा प्रत्येकामध्ये असते. जर तुम्हाला स्वयंपाक करण्यात रस असेल  तर त्याविषयी या वर लिहू शकता. गुगलवर खूप शोधला जाणार्‍या विषयांपैकी vegan blogs हा एक विषय आहे. महिलांना ब्लॉग सुरू करायचा असेल तर त्यांच्यासाठी हा एक अतिशय फायदेशीर विषय आहे. चविष्ट, रुचकर आणि पोषक भोजन बनवण्याची कला अथवा शास्त्र म्हणजे पाककला. महाराष्ट्रातसुद्धा कोकण, खाणदेश, विदर्भ, मराठवाडा इत्यादी भागांमध्ये वेगवेगळे पदार्थ व पाककृती पहायला मिळतात. मराठी पाककृतींमधे शाकाहारी आणि त्याचबरोबर मांसाहारी या दोन्ही प्रकारचे पदार्थ महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात चवीने खाल्ले जातात. यापदार्थांच्या पाककृतींची माहिती तुम्ही या ब्लॉगमध्ये देऊ शकता.

 

9) फूड ट्रॅव्हल ब्लॉग :-

वेगवेगळ्या ठिकाणचे चविष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर त्या डिशचं वैशिष्ट्य, त्याची चव, पाककृती इत्यादींबाबत ब्लॉगवर लिहू शकता. अनेक खाद्यप्रेमी मंडळी असं खूप काही आपल्या ब्लाॅगवर शेअर करत असतात. अनेक ‘फूड ब्लॉगर्स’नी वेगवेगळ्या रेसिपींचे रिव्ह्यू त्यांच्या पेजवर प्रसिद्ध केलेले आहेत. अनेकजण सध्या फूड ब्लॉगर म्हणून प्रसिद्ध आहेत. विविध हॉटेल्सकडून या ब्लॉगर्सना चांगलीच मागणी असते. एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर त्याचा आकर्षक फोटो, त्या पदार्थाचं वेगळेपण आणि तो पदार्थ कुठे मिळतो याविषयीची संपूर्ण माहिती ही मंडळी त्यांच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध करतात. इन्स्टाग्रामवर फूड ब्लॉगिंगची सर्वाधिक क्रेझ असून, अशा फूड ब्लॉगर्सना खास हॉटेलांकडून आमंत्रित केलं जातं. अनेक ठिकाणच्या स्ट्रीटफूडविषयीपण तुम्ही लिहू शकता आणि त्या पदार्थाची वैशिष्ट्ये लोकांपर्यंत पोहोचवू शकता.

 

10) फायनान्स विषयक ब्लॉग :-

 फायनान्स ब्लॉग हा सध्या सगळ्यात जास्त चालणारा ब्लॉग आहे ज्यामध्ये तुम्ही पैसे कसे कमवायचे, कसे टिकवायचे, कसे गुंतवायचे अशा अनेक टिप्स, ट्रिक्स आणि त्याविषयी माहिती देऊ शकता.  गुंतवणूक हा लोकांच्या आवडीचा विषय आहे. म्हणूनच अर्थसंकल्प हा एक मोठा विषय आहे.

 

 

 

11) लाईफस्टाईल ब्लॉग :-

या ब्लॉगमध्ये तुम्ही फॅशन, ब्युटी टिप्स, कल्चर, फूड, ट्रॅव्हल, हस्तकला, सजावट, हेल्थ टिप्स इ. दैनंदिन जीवनातील विषयांवर  माहिती लिहून वाचकांपर्यंत पोहोचवू शकता.

अमित अग्रवाल हे भारतातले पहिले प्रोफेशनल ब्लॉगर आहेत. पुढे काही टॉप टेन भारतीय ब्लॉगर्सची नावे दिली आहेत.

1) अमित अग्रवाल

2) श्रध्दा शर्मा

3) हर्ष अग्रवाल

4 आशिष सिन्हा

5) वरूण क्रिष्णण

6) प्रदीप कुमार

7) अरूण प्रभू देसाई

8) अमित भवानी

9) श्रीनिवास तमादा

10) जसपाल सिंग 

मित्रांनो ब्लॉग म्हणजे स्वतःचा स्वतःशी साधलेला संवाद. आपण दररोज इतरांशी गप्पा मारतो पण आपली आपल्याशी कधी गाठभेट होत नाही. तो कप्पा म्हणजे ब्लॉग. आपल्या सुदैवाने आपल्या हातातल्या मोबाईल फोनवरून देखील आपण त्याचे सहज संचालन करू शकतो. आत्मसंवाद साधण्या सोबतच समाजात सर्जनातमक बदल घडविण्याचे सामर्थ्य या क्षेत्रात आहे, हे यशस्वी ब्लॉगर्सकडे पाहीले की सहज लक्षात येते. त्यातूनच चांगल्या प्रकारे तुमची उपजीविका सुद्धा चालविली जाऊ शकते. कामाचा आनंद आणि आनंदाचे काम करायचे असेल तर ब्लॉग लेखनाकडे गांभीर्याने पाहायला हवे. सर्वांना लेखनास अनेकानेक  शुभेच्छा...!!

 

श्री.गजानन कोंडीबा चौधरी

सहशिक्षक

जि.प.प्रा.शा.पार्डी खुर्द

ता.वसमत जि.हिंगोली

Blog:- www.zppstech.com

Youtube:- https://youtube.com/@ZPPSTEC

 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने