तळागाळातील गरजू लाभार्थ्यापर्यंत योजना पोहोचविण्याचा समाजकल्याण विभागाचा प्रामाणिक प्रयत्न- प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ

 

 

 ब्युरो टीम : तळागाळातील समाजघटकांसाठी योजना राबवितांना जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, निवासी आश्रम शाळा, महाविद्यालये व सामाजिक कार्यकर्त्यांचे समाज कल्याण विभागाला नेहमीच सहकार्य लाभत आले आहे.या पाठबळामुळेच सामाजिक न्याय विभागाच्या योजना तळागाळातील गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. असे प्रतिपादन नाशिक समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांनी आज येथे केले.

नाशिक समाज कल्याण विभाग प्रादेशिक उपायुक्त कार्यालय व अहमदनगर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समान संधी केंद्र व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन श्री.वाघ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त अनिशा शेख, संशोधन अधिकारी भाऊ खरे, समाज कार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पठारे, भटके विमुक्त कल्याण समितीच्या निमंत्रक मुमताज शेख, समाज कल्याण विभाग अहमदनगरचे अशासकीय सदस्य ॲड. डॉ. अरुण जाधव, लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ, बार्टीचे प्रकल्प अधिकारी दिलावर शेख आदी उपस्थित होते.

श्री. वाघ म्हणाले की, समाज कल्याण विभागाच्या सर्व योजनांची शंभर टक्के अंमलबजावणीसाठी प्रयत्न करावेत. मागासवर्गीय विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन व सहाय्य करावे. २६ मे ते २६ जून २०२३ या कालावधीत राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती महोत्सवा निमित्त सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबद्दल जनजागृती करून लाभार्थ्यापर्यंत योजना पोहोचविण्याचा प्रयत्न प्रशासन करित आहे.असे ही वाघ यांनी यावेळी सांगितले.

इयत्ता १० वीच्या शासकीय निवासी शाळांतील १०० टक्के निकाल लावणाऱ्या शिक्षकांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अनिशा शेख, ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले. कार्यशाळेस जिल्ह्यातील आश्रम शाळा, शासकीय निवासी शाळा, वसतिगृहाचे अधीक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व लाभार्थी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात जामखेड तालुक्यातील भटके विमुक्त समूहातील काही लोकांना प्रातिनिधिक स्वरूपात जातीचे दाखले व रेशनकार्डचे वितरण करण्यात आले. राधाकिसन देवढे यांनी प्रास्ताविक केले. शाकीर शेख यांनी सूत्रसंचालन केले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने