Chandrshekhar Bavankule: पवारांना धमकी देणाऱ्याला तत्काळ अटक व्हावी - चंद्रशेखर बावनकुळे



ब्युरो टीम : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पवार यांच्यासारख्या व्यक्तीला धमकी देणाऱ्याला तत्काळ अटक करून तुरुंगात टाकले पाहिजे. पवारांसारख्या वरिष्ठ नेतृत्वाला धमकी देणे योग्य नाही. राज्य सरकारकडून योग्य कारवाई करण्यात यावी, असे बावनकुळे म्हणाले. शुक्रवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. धमकी देणारा व्यक्ती कुठल्याही पक्षाचा असला तरी ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असा प्रकार करणाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या धोरणांवर टीका केली.

राष्ट्रवादीची स्थापना किंवा शरद पवार यांच्या राजकीय जीवनाचा विचार केला तर छगन भुजबळ वगळता कुठल्याही ओबीसीला मानाचे स्थान मिळाले नाही. विदर्भात येऊन राष्ट्रवादी दोन दिवसांचे शिबीर घेत असताना त्यात ठराव होतील. राष्ट्रवादीचे अध्यक्षपद किंवा प्रदेशाध्यक्षपद ओबीसीला देतील असे वाटले होते. मात्र नागपुरच्या अधिवेशनातदेखील याबाबत पुढाकार घेण्यात आला नाही. हे अधिवेशन म्हणजे केवळ दिखावाच होते, असा आरोप त्यांनी लावला.

मुख्यमंत्र्यांना कुटुंब नाही का ?

मुख्यमंत्री तीन दिवस कुटुंबियांसह बाहेर फिरायला गेले तर त्यावरून विरोधकांनी राजकारण सुरू केले आहे. एकनाथ शिंदे हे मागील अनेक वर्षांपासून राजकारण व समाजकारणात सक्रिय आहेत. मात्र त्यांनादेखील कुटुंब नाही का ? ते कुटुंबियांसह वेळ काढून बाहेर गेले तर त्यात काहीच वावगे नाही. विरोधक जाणुनबुजून चुकीचा 'नॅरेटिव्ह' तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बावनकुळे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने