Congress : आकड्यांमुळे महाविकासआघाडीत बिघाडी होणार? काँग्रेसचा सर्व्हे बाहेर

 


ब्युरो टीम:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आलेल्या एका सर्व्हेमुळे राजकारण तापलेलं असतानाच आता काँग्रेसच्या एका अहवालामुळे महाविकासआघाडीत बिघाडीची शक्यता निर्माण झाली आहे. या अहवालातून करण्यात आलेला दावा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्ष मान्य करणार का? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागावाटपाच्या चर्चेला अजून सुरुवात झालेली नाही, पण त्याआधीच तिन्ही पक्षांकडून त्यांची दावेदारी जाहीर केली जातेय. राज्यातील 2-4 जागांवरुन महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरु आहे, पण याच ओढाताणीत आता महाराष्ट्र काँग्रेसनं एक अहवाल पक्षश्रेष्ठींना दिलाय. ज्यात 48 पैकी 21 लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सकारात्मक असल्याचा दावा करण्यात आलाय. 40 लोकसभा आणि 200 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघात पक्षाची परिस्थिती खूप चांगली आहे. येणाऱ्या काळात लोकसभा-विधानसभा निवडणुकीत जोमानं कसं जायचं आहे, याची तयारी सुरू झाली आहे, असं काँग्रेस नेते नसीम खान म्हणाले आहेत.

विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक, अकोला, वर्धा, यवतमाळ, अमरावती, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, शिर्डी, मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, लातूर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर, हातकणंगले, सांगली आणि मुंबईतील

दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम हे 21 मतदारसंघ काँग्रेससाठी सकारात्मक असल्याचं सांगण्यात आलंय.                काँग्रेसनं हा अहवाल सादर करत निम्म्या जागांवर अप्रत्यक्ष दावा केल्याचं पाहायला मिळतंय, पण, राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र काँग्रेसचा हे निरीक्षण आणि दावा फेटाळून लावलाय. मागचे दोन-तीन सर्व्हे झाले त्याच्या एजन्सी आहेत त्या नावाजलेल्या आहेत, अशा एजन्सीनी सर्व्हे पुढे आणला तर लोक विश्वास ठेवतील, अशी कोणतीही एजन्सी पकडायची आणि सर्व्हे आपल्या नावाने करून घ्यायचा, असा टोला राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी लगावला आहे.

लोकसभेच्या जागावाटपाआधीच महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. त्यात काँग्रेसनं पक्षश्रेष्ठींकडे अहवाल सादर करुन जास्तीत जास्त जागांसाठी आग्रही राहण्याची रणनीती आखली आहे, त्यामुळे या अहवालाचा महाविकासआघाडीच्या जागावाटपावर काय परिणाम होतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने