Haribhau bagade : हरिभाऊ बागडे पु्न्हा मैदानात; काहींचा वाढला बीपी; नेमकं काय घडलं?



ब्युरो टीम : सरकारी काम कशी चालतात याचा अनुभव आपल्या सगळ्यांना कधी ना कधी आलेलाच असेल. लोकांची काम होत नाहीत म्हणून अनेक नेत्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या घटनाही घडत असतात.

फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध कामांच्या फायली अडकून पडलेल्या आहेत. त्यासाठी माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचं पहायाला मिळालं. विधानसभेचे माजी अध्यक्ष, भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे तसे शांत. मात्र तत्वाला धरून नैतिक संयमी राजकारण करणाऱ्या फुलंब्रीचे आमदार बागडे यांचाही संयम शेवटी तुटलाच.

याला कारण ठरले ते पंचायत समितीचे अधिकारी, शेतकऱ्यांनी विविध योजनांच्या फाईल्स मंजुरीराठी पंचायत समितीमध्ये दाखल केल्या आहेत. मात्र अनेक दिवस उलटून देखील काम होत नसल्यानं हरिभाऊ बागडे चांगलेच आक्रमक झाले. ते थेट पंचायत समिती कार्यालयात पोहोचले. त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरला.

शासन आपल्या दारी योजनेमार्फत येत्या 24 जूनपर्यंत गरजुंच्या कामांचा निपटारा करण्याचे आदेश शासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र तरीही काम होत नसल्यानं हरिभाऊ बागडे यांनी थेट पंचायत समिती कार्यालय गाठलं आणि ठिय्या मांडला. हरिभाऊ बागडे पंचायत समितीमध्ये आल्याचे कळताच अनेक शेतकरी देखील पंचायत समितीमध्ये दाखल झाले. हरिभाऊ बागडे यांनी स्वत: फाईलचे गठ्ठे पाहाण्यास सुरुवात केली.

जोपर्यंत काम पूर्ण होणार नाही, तोपर्यंत आपण इथून जाणार नसल्याचा पवित्रा हरिभाऊ बागडे यांनी घेतला. त्यामुळे काही अधिकाऱ्यांना घाम फुटला तर काहींचा बीपी वाढला. काम होत नसल्याचा पाढाच शेतकऱ्यांनी यावेळी वाचला.

हरिभाऊ बागडे यांनी रात्री 10 वाजता पंचायत समितीमध्येच शेतकऱ्यांसोबत जेवण केले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी कार्यालयातच झोपण्याची तयारी देखील केली. त्यामुळे अधिकाऱ्यांवरील दबाव आणखी वाढला, येत्या काही दिवसांत सर्व फाईल मार्गी लावू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर रात्री उशीरा हरिभाऊ बागडे पंचायत समितीच्या बाहेर पडले अन् अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने