ब्युरो टीम : 'मराठी पत्रकार परिषदेचा लढा हा कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नसून हा लढा पत्रकारांच्या हक्कासाठी, स्वातंत्र्यासाठी सुरू आहे. पूर्वीपासून परिषद ही पत्रकारांच्या प्रश्नावर, हक्कावर, पत्रकारांच्या संरक्षणच्या मुद्द्यावर लढत आली आहे. येथून पुढेही हा लढा पत्रकारांच्या हितासाठी सुरू राहील,' असे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी स्पष्ट केले. 'जे कोणी पत्रकारांच्या विरोधात बोलतील, पत्रकारांच्या हक्काच्या विरोधात बोलतील त्यांच्या विरोधात परिषद आपली भूमिका मांडत राहील,' असेही ते म्हणाले.
मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांची ऑनलाईन बैठक झाली. राज्यातील 35 जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांपैकी 32 जिल्ह्यातील प्रतिनिधी बैठकीस हजर होते. या बैठकीत मार्गदर्शन करताना देशमुख बोलत होते. यावेळी धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार गो. पी. लांडगे यांना यंदाचा स्व. संतोष पवार उत्कृष्ट जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा देशमुख यांनी केली.
बैठकीला विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कोषाध्यक्ष विजय जोशी, परिषदेच्या डिझिटल शाखेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, राज्याचे सहाय्यक प्रसिध्दी प्रमुख संदीप कुलकर्णी, संजय सांळूके ( ठाणे ), विजय घरत (जि.पालघर), भारत निगडे (जि.पुणे) , कमलेश ठिकूर ( जि.रायगड ) , हरीशचंद्र पवार (जि. सिंधूदूर्ग), जमिर खलपे (जि. रत्नागीरी), दिपक शिंदे (जि.सातारा), भाऊसाहेब सकट (जि.कोल्हापूर), प्रकाश आरोटे (अहमदनगर उत्तर), प्रमोद दंडगव्हान (नाशीक), गोपी भाऊ लांडगे (धुळे), संजय हांगे ( बीड ), प्रकाश इंगोले (हिंगोली), गजानन वाघ (वाशीम), मोहन चौकीदार (बुलढाणा), निलेश जवकार (अकोला),सुभाष राऊत (नागपूर ), बबन मेश्राम (भंडारा) , यशवंत थोटे ( गोंदीया ), प्रतिक मेघे (वर्धा) , बबलू दोडके (अमरावती), सुधाकर श्रीखंडे (परभणी)आदी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख होते.
याप्रसंगी एस. एम. देशमुख म्हणाले,' राज्यभरातील प्रसिध्दी प्रमुख हे परिषदेचे कान व डोळे आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याची राज्यपातळीवर नोंद घेतली जावी, यासाठी संतोष पवार यांच्या नावे दरवर्षी एका प्रसिद्धी प्रमुखास सन्मानित करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे. पहिल्याच वर्षी गो. पी. लांडगे यांना हा पुरस्कार दिला जात आहे. गो. पी. लांडगे हे गेली 50 वर्षे परिषदेशी जोडलेले आहेत. परिषदेचे उपाध्यक्ष आणि परिषदेचे धुळे - नंदूरबार प्रसिद्धी प्रमुख म्हणून ते सध्या काम करीत आहेत. परिषदेच्या प्रत्येक बातमीला स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्धी मिळवून देण्याबरोबरच परिषदेची प्रतिमा उज्ज्वल करण्याचे ते काम करतात. परिषदेच्या प्रत्येक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्याबद्दल त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 23 जून 2023 रोजी रोजी मुंबईत गौरविण्यात येणार आहे,' असे सांगतानाच देशमुख पुढे म्हणाले,'मराठी पत्रकार परिषद कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. आपली भूमिका ही जे पत्रकाराच्या विरोधात आहे, त्यांच्या विरोधात राहिली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विषयावर आपण बोलतच राहू. संघटना वाढवण्यासाठी परिषदेचे प्रत्येक पदाधिकारी प्रयत्न करत असून त्यामध्ये जिल्हाप्रसिद्धीप्रमुखांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. परिषेदेचे कामकाज हे प्रत्येक जिल्ह्यात पोहोचावे, या दृष्टीने जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी काम करण्याची गरज आहे.'
तर, यावेळी विश्वस्त किरण नाईक यांनी सांगितले की, 'मराठी पत्रकार परिषदेचे आतापर्यंतची वाटचाल ही खूपच महत्त्वपूर्ण आहे. जिल्हा प्रसिद्ध प्रमुख म्हणून तुम्ही परिषदेचे कामकाज, हे गाव पातळीवर पोहोचवण्यासाठी जे प्रयत्न करता ते कौतुकास्पद आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्याला मदत करण्यासाठी परिषदेचे राज्यातील प्रत्येक पदाधिकारी कटिबद्ध असून तुम्हाला जेव्हा मदतीची गरज लागेल, तेव्हा आवर्जून हाक द्या.'
बैठकीत प्रास्ताविक करताना अध्यक्ष शरद पाबळे यांनी मागील जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांच्या बैठकीचा आढावा सांगितला. तसेच त्यांनी कर्जत (जि. अहमदनगर), बीड, नाशिक येथील मेळाव्याला विविध माध्यमांमध्ये मिळालेल्या प्रसिद्ध बद्दल सर्व प्रसिद्धी प्रमुखांचे अभिनंदन केले. तसेच लवकरच पुणे येथे राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. सहायक राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा