ब्युरो टीम : निवडणुकीच्या वर्षात कोण असणार महाराष्ट्र काँग्रेसचा नवा प्रभारी याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसचे सध्याचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील हे सध्या कर्नाटकमध्ये कॅबिनेट मंत्री बनले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी लवकरच नवा प्रभारी नेमला जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रासाठी हे वर्ष निवडणुकांचं आहे. मुंबई महापालिकेसह 25 महापालिकांसह, लोकसभा, विधानसभा निवडणुका पुढच्या काळात अपेक्षित आहेत. त्यादृष्टीने विचार करुन काँग्रेसला आपला नवा प्रभारी नेमावा लागणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्राथमिक चाचणी सुरु केली आहे. राहुल गांधी 18 जूनला विदेशातून मायदेशी परतल्यावर याबाबतच्या हालचालींना वेग येईल असं सांगितलं जात आहे.
काँग्रेसला काय काळजी घ्यावी लागणार?
महाराष्ट्रातला प्रभारी नेमताना काँग्रेसला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग आहे. इथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणी काँग्रेस नेतृत्वाला करावी लागते. त्यामुळेच नवा प्रभारी कोण असणार याची उत्सुकता आहे.
एच के पाटील हे सप्टेंबर 2020 पासून महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून काम पाहत होते
पाटील हे मूळचे कर्नाटकमधल्या गदगचे
त्यांच्या आधी मल्लिकार्जुन खरगे हे 2018 मध्ये महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नियुक्त झाले होते
2019 च्या निवडणुकीच्या तोंडावरच खरगेंसारखा ज्येष्ठ नेता महाराष्ट्रात काँग्रेसने पाठवला होता
आताही निवडणुकांना एक वर्ष उरलंय, त्यामुळे या महत्वाच्या वर्षात काँग्रेस ही जबाबदारी कुणाकडे देतं हे पाहणं महत्वाचं असेल
एच के पाटील यांना महाराष्ट्र काँग्रेसचं प्रभारीपद सोडावं लागणार
राज्यात मंत्री बनलेल्या व्यक्तीला संघटनेचं काम करण्यात मर्यादा येतात. इतर राज्यांचे प्रभारी म्हणून काम करताना अनेक दौरेही करावे लागतात. त्यामुळेच एच के पाटील हे कर्नाटकात पर्यावरण मंत्री बनल्यानंतर त्यांना महाराष्ट्र काँग्रेसचं प्रभारीपद सोडावं लागणार हे उघड आहे.
काँग्रेसमध्ये वर्किंग कमिटीची नवी रचनाही लवकरच अपेक्षित आहे. रायपूरमधल्या महासंमेलनातच याबाबत घोषणा झाली होती. त्यामुळे नवी वर्किंग कमिटी, नवे प्रभारी या दोन्ही गोष्टी पुढच्या काही दिवसांतच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा