Narendra modi :पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 'सिद्धासन'; व्हाइट हाउसला भेट देणारे तिसरे भारतीय नेते

 


ब्युरो टीम : आंतरराष्ट्रीय योगदिनीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हा अग्रलेख वाचकांच्या हाती पडेपर्यंत अमेरिकेत पोहोचले असतील.

त्यानंतर काही तासांनी वॉशिंग्टनमधील आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्राच्या परिसरात ते अनेक मान्यवरांसोबत योग प्रात्यक्षिकांमध्येही सहभागी होतील. पंतप्रधानांचा दौरा व आंतरराष्ट्रीय योग दिन भलेही योगायोग असेल. तथापि, अमेरिकेचे अधिकृत सरकारी पाहुणे म्हणून तीन दिवसांच्या दौऱ्यावर नरेंद्र मोदी, विविध कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमांचे ऐतिहासिक महत्त्व हा योगायोग नक्कीच नाही. या दौऱ्याच्या तोंडावर चीनने लावलेला तिरका व चिरका सूर लक्षात घेतला तर जागतिक महासत्तांच्या स्पर्धेत मोदींच्या दौऱ्याच्या रूपाने नवा अध्याय लिहिला जात आहे.

योगाच्या अनुषंगाने विचार करता हा दौरा म्हणजे एक सिद्धी आणि मोदींच्या दृष्टीने हे एक सिद्धासन असेल. पंतप्रधानांचे या दौऱ्यातील अनेक पैलू ऐतिहासिक म्हणून नोंद होतील. पहिली बाब, अमेरिकन काँग्रेस म्हणजे सिनेट व हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांपुढे संयुक्त भाषण करणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. त्यातही विन्स्टन चर्चिल व नेल्सन मंडेला यांसारख्या थोर नेत्यांनाच अशी दोनवेळा अमेरिकन काँग्रेसपुढे बोलण्याची संधी मिळाली आहे. दुसरी बाब, जून १९६३ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन व नोव्हेंबर २००९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यानंतर अमेरिकेचे सरकारी पाहुणे म्हणून व्हाइट हाउसला भेट देणारे मोदी हे केवळ तिसरे भारतीय नेते असतील.

तिसरी बाब, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युल मॅक्रॉन व दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सक येऊल यांच्यानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रात्रीच्या स्नेहभोजनासाठी निमंत्रित केलेले ते जगातील तिसरे नेते आहेत. याशिवाय, या दौऱ्यात अमेरिकेतील उद्योगपतींच्या ते भेटी घेतील. विशेषतः संरक्षण व विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील विदेशी औद्योगिक गुंतवणुकीसंदर्भात बरेच करार मदार होतील. आता द्विटरपासून दूर झालेले संस्थापक जॅक डोर्सी यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल केलेल्या भारत सरकारवरील टीकेच्या पार्श्वभूमीवर ट्रिटरचे नवे मालक एलॉन मस्क यांचीही ते भेट घेणार आहेत. तथापि, मोदींच्या या दौऱ्याच्या निमित्ताने जगाचे लक्ष लागले आहे ते जेट इंजिनविषयक कराराकडे. अमेरिकेची जनरल इलेक्ट्रिक ही विख्यात कंपनी तिच्या जीई-एफ४१४ या जेट इंजिनाच्या पुरवठ्यासंदर्भात ऐतिहासिक व्यापारी करार करण्याची शक्यता आहे.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजे एचएएलसोबत पंतप्रधानांच्या उपस्थितीत हा करार अनेकदृष्टींनी महत्त्वाचा असेल. अमेरिकेच्या लढाऊ विमानांसाठी वापरले जाणारे हे आधुनिक तंत्रज्ञानयुक्त इंजिन सामरिक सज्जतेच्या दृष्टीने जगाच्या आकर्षणाचा विषय आहे. अशारीतीने हे तंत्रज्ञान अमेरिकेने जगातील अन्य कोणत्याही राष्ट्राला हस्तांतरित केलेले नाही. म्हणूनच, अमेरिकेशी स्पर्धा करणाऱ्या चीनने मोदींसाठी अमेरिकेने अंथरलेल्या पायघड्या म्हणजे भारताच्या आडून चीनवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. चीन या दौऱ्याबद्दल काय विचार करतो यावर भारताने फार काळजी करण्याचे कारण नाही. तसे पाहता रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणानंतर जगाची विभागणी, आक्रमणाची आगळीक करणारा रशिया आणि त्याचा प्राणपणाने मुकाबला करणारा युक्रेन अशी दोन फळ्यांमध्ये झालीच आहे.


कच्च्या तेलाची आयात व अन्य काही मुद्द्यांवर भारत थोडाबहुत तटस्थ असल्याचे, झालेच तर रशियाशीही संबंध टिकविण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसले खरे. पण, पंतप्रधान मोदी यांनी दौऱ्यावर निघण्याआधी वॉलस्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही तटस्थ आहोत हा गैरसमज आहे. आम्ही शांततेच्या बाजूचे आहोत, हे मोदींचे विधान अधिक महत्त्वाचे आहे. अर्थातच, या विविध कारणांमुळे मोदींचा अमेरिका दौरा भारतात तसेच जगभरात चर्चेचा विषय राहील. काँग्रेस नेते राहुल गांधी गेले तीन आठवडे परदेशात आहेत. अमेरिकेतील अनिवासी भारतीय व पत्रकारांपुढे भाजप व केंद्र सरकारच्या धोरणांवर त्यांनी टीका केली. इकडे तिचा प्रतिवाद भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला. आता राहुल भारतात व मोदी अमेरिकेत असतील तेव्हाही तसेच होईल. पण, सामान्य भारतीयांच्या दृष्टीने आपल्या पंतप्रधानांसाठी अमेरिकेत अंथरलेल्या पायघड्या, जागतिक नेता म्हणून त्यांना मिळणारा मानमरातब, देशाचे भवितव्य अधिक सुखकर, उज्ज्वल बनविणारे करार मदार हेच अधिक महत्त्वाचे आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने