ब्युरो टीम : ताहाराबाद (ता. राहुरी, जि. अहमदनगर) येथील संत कवी महिपती महाराज यांच्या दिंडीचे रविवारी (18 जून) मराठी पत्रकार परिषद मुंबई यांच्या वतीने अहमदनगर शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले. दिंडीतील वारकर्यांना वारीसाठी आरोग्यमय शुभेच्छा देत उपयुक्त औषधी कीटचे वितरण करण्यात आले. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल... श्री ज्ञानदेव तुकाराम च्या गजर करीत रुसलेला पाऊस वरुणराजा प्रसन्न होत दमदार बरसावा यासाठी वारकर्यांच्या उपस्थितीमध्ये पांडुरंग चरणी प्रार्थना करण्यात आली.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूरभाई शेख यांच्या पुढाकारातून मराठी पत्रकार परिषदेच्या अहमदनगर शाखेच्या वतीने अहमदनगर शहरातील सर्व पत्रकारांना सोबत घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून मराठी पत्रकार परिषेदेच्या वतीने पत्रकारांतर्फे वारकर्यांना उपयुक्त औषधांचे कीट वाटप करण्याचा उपक्रम सुरू आहे. या वर्षी संत कवी महिपती महाराज देवस्थानच्या दिंडीत हा उपक्रम राबविण्यात आला. नगर-मनमाड महामार्गावरील हुंडेकरी शोरूम समोर दिंडीचे स्वागत करुन वारकर्यांना औषधी कीटसह अल्पोपहाराचे वाटपही करण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूरभाई शेख, ज्येष्ठ पत्रकार विजयसिंह होलम, परिषेदेचे सहायक राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, माजी नगरसेवक अॅड. धनंजय जाधव, नगरसेविका सुप्रियाताई जाधव, सोमनाथ जाधव, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे महेश महाराज देशपांडे, बंडू पवार, कायदेविषयक सल्लागार अॅड. शिवाजी कराळे, गोरक्षनाथ बांदल, अर्जुन राजापुरे, अमित आवारी, वाजिद शेख, नवीद शेख, उदय जोशी, अकीस सय्यद, अनिकेत गवळी, रमीज शेख, शब्बीर सय्यद, प्रवीण सुरवसे, सोमनाथ मैड, जी.एन. शेख आदींसह पत्रकार बांधव, वृत्त छायाचित्रकार व माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दिंडीतील ह.भ.प. नाना महाराज गागरे, बालकृष्ण महाराज कांबळे, अर्जुन महाराज तनपुरे, दिंडी प्रमुख बाबासाहेब वाळुंज, सचिव बाळासाहेब मुसमाडे, विणेकरी बापूसाहेब गागरे, चोपदार राजू चव्हाण, सुधीर काकडे, रावसाहेब मिस्त्री, नाना शिरसाठ यांच्याकडे वारकर्यांसाठी आणलेले औषधी कीट उपस्थितांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आले.
ह.भ.प. नाना महाराज गागरे म्हणाले की, 288 संतांचे चरित्र अभ्यासून महिपती महाराजांनी समता व माणवतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविला. या भूमीतील संतांची खरी ओळख त्यांनी करून दिली. सामाजिक, समता व बंधुत्वाचा विचार घेऊन महिपती महाराजांची दिंडी आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाते. दिंडी सोहळ्याला तीनशे वर्षाची परंपरा आहे. ही दिंडी फक्त वारीसाठी जात नसून, येताना मोठ्या भक्तीभावाने पांडुरंगाला बरोबर घेऊन येते आणि गोपाल काळाचा उत्सव उत्साहात साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
अॅड. धनंजय जाधव यांनी अनेक वर्षांपासून शहरातील पत्रकार वारकरींची करीत असलेली सेवा कौतुकास्पद आहे. ऊन, वारा व पाऊसात वारीसाठी निघालेली वारी आरोग्यदायी होणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली. मन्सूरभाई शेख यांनी दरवर्षी वारकर्यांना पत्रकारांच्या वतीने देण्यात येणार्या आरोग्य सेवेची माहिती दिली. दिंडी प्रमुख बाबासाहेब वाळुंज यांनी सर्व पत्रकारांचे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा