Pimpri-Chinchwad :भाजपचे विधानसभा निवडणुकांसाठी मतदारसंघात नवे कारभारी

 


 ब्युरो टीम : लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुका एकत्रित होण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत आहे. त्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली असून, विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी निवडणूक प्रमुखांची निवड केली आहे.

त्यामध्ये शहरातून पिंपरी मतदारसंघातून अमित गोरखे, चिंचवडमधून काळूराम बारणे, भोसरीमधून विकास डोळस आणि मावळमधून रवी भेगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपाने निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. भाजप, शिवसेना आणि आरपीआय हे पक्ष महायुतीमध्ये निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच स्वबळावर लढण्याची वेळ आली तरी ताकद कमी पडू नये, यासाठी भाजपाने आखणी केली आहे. त्यासाठी लोकसभा मतदारसंघामध्ये समन्वयक नेमल्यानंतर आता विधानसभेसाठीदेखील निवडणूक प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी काढले.

भोसरी विधानसभेमध्ये आमदार महेश लांडगे आहेत. त्यांनी शिरूर लोकसभेसाठीदेखील शड्डू ठोकला आहे. भोसरीमध्ये विकास डोळस यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. ते माजी नगरसेवक असून, आमदार महेश लांडगे यांचे विश्वासू मानले जातात, तर दुसरीकडे पिंपरीतून अमित गोरखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोरखे हे अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळावर अध्यक्ष होते. तसेच ते सध्या प्रदेश सचिवदेखील आहेत. पिंपरी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक आहेत. त्यांना निवडणूक प्रमुख केल्याने बळ मिळणार आहे.

तर चिंचवड विधानसभेसाठी काळूराम बारणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते बांधकाम व्यावसायिक असून चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांशी त्यांचा चांगला समन्वय आहे. तसेच मावळ विधानसभा मतदारसंघातून रवी भेगडे यांची नियुक्ती झाली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने