Primary education : शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड हवीच- प्रा. गजानन चौधरी



ब्युरो टीम : तंत्रज्ञान कायमच शिक्षणाचे एक महत्त्वपूर्ण अंग राहिलेले आहे. ते व्यवहारिक परिवर्तनासोबतच माणसाची विचारक्षमता आणि समज विकसित करतं. तंत्रज्ञानाचा उपयोग केला तर शिक्षण सरळ, सुगम आणि रुचीपूर्ण होतं. बालकेंद्रित शिक्षणाचा विचार करताना शैक्षणिक तंत्रज्ञानाचं महत्त्व आणखी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या लक्षात येतं. कारण शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या विविध तंत्र आणि माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थी स्वयंअध्ययन करू शकतो. स्वतःचं ज्ञान आपली आवड, वेळ, सुविधा आणि क्षमता यानुसार तो अद्ययावत करू शकतो. प्रस्तुतच्या लेखामध्ये शिक्षणाला तंत्रज्ञानाची आवश्यकता या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.

शैक्षणिक तंत्रज्ञानाचा अर्थ

 आजचं युग विज्ञानाचे युग आहे. विज्ञानाने मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूला प्रभावित केले आहे. त्यामध्ये शिक्षण हे महत्त्वाचे क्षेत्र आहे. शिक्षण प्रक्रियेमध्ये मशीन, कम्प्युटर, रेडिओ, टेलिव्हिजन, भाषा प्रयोगशाळा आदीबरोबरच विविध पद्धती आणि व्यूहरचनांचा उपयोग करून शिक्षणाचे उद्देश प्राप्त केले जाऊ शकतात. शिक्षकाचे कार्य सरळ आणि प्रभावी होण्यासाठी विभिन्न प्रकारच्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर शिक्षकांमार्फत केला जातो. या विविध तंत्रज्ञानाला शैक्षणिक तंत्रज्ञान असे देखील म्हटले जाते. आधुनिक काळामध्ये शिक्षण आणि शिक्षणाच्या अध्ययन अध्यापनाच्या बाबतीतल्या प्राचीन संकल्पना बदललेल्या आहेत. एनसीएफ २००५ नुसार बालकाला शिक्षण प्रक्रियेच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. त्यासाठी शिक्षण प्रक्रिया सरळ आणि सोपी असणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून बालकाचे अध्ययन अधिक सुकर होऊ शकेल.

शैक्षणिक तंत्रज्ञानाचे शिक्षण प्रक्रियेसाठी फायदे

१) शैक्षणिक उद्दिष्टांचे निर्धारण:- कोणत्याही शिक्षण कार्याची यशस्वीता ही शैक्षणिक उद्दिष्टांच्या उचित निर्धारणांवर अवलंबून असते. समाजाच्या आकांक्षा आणि आवश्यकता पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक तंत्रज्ञान विविध स्रोतांद्वारे माहिती उपलब्ध करून देते. व्यापक शैक्षणिक उद्दिष्टांच्या निर्धारणाबरोबरच शिक्षणाशी संबंधित उद्दिष्टांचे निर्धारण आणि त्या उद्दिष्टांना व्यावहारिक शब्दांमध्ये लिहिण्यासाठी शैक्षणिक तंत्रज्ञान मदत करते.

२) अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे विश्लेषण :- शैक्षणिक तंत्रज्ञानाने अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये सुधारणा आणि संपूर्ण प्रक्रियेला अर्थ देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी शैक्षणिक सिद्धांत शैक्षणिक सूत्र यांचा देखील विकास करून त्यांचा उपयोग केला जातो.

३) विविध अध्यापनाच्या पद्धती आणि व्यूहरचनांची निवड :- शैक्षणिक तंत्रज्ञान विविध युक्ती आणि प्रयुक्त्यांच्या निवडीबरोबरच त्यांच्या विकसनामध्ये मदत करते. उदाहरणार्थ नाट्यीकरण, कठपुतळी, खेळ पद्धत अशा भिन्न पद्धतींचा उपयोग करत शिक्षणाला प्रभावी बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचे सहकार्य मिळते. शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्या पद्धतींचे ज्ञान होते. त्यांच्या मदतीने विषय अधिक प्रभावी पद्धतीने मांडला जाऊ शकतो.

४) दृकश्राव्य सामग्रीचे चयन, विकसन, उत्पादन आणि उपयोग :- दृकश्राव्य सामग्री जर वापरली तर अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात मदत मिळते. शैक्षणिक तंत्रज्ञानाचा उपयोग या सामग्रीचे निर्माण, विकास आणि निवड यासाठी होतो.

५) शैक्षणिक नियोजन आणि मूल्यमापन :- शैक्षणिक तंत्रज्ञान विभिन्न व्यक्तींना समाजाची मूल्ये विश्वास आवश्यकता या अनुसार शिक्षणाची योजना बनवण्यासाठी मदत करते जेणेकरून विभिन्न शैक्षणिक कार्यक्रमांना अधिक कुशल आणि अर्थपूर्ण बनवले जाऊ शकते त्याचबरोबर शैक्षणिक तंत्रज्ञान विभिन्न मूल्यमापनाच्या तंत्रांचा विकास आणि उपयोग करण्यासाठी उचित पाठबळ प्रदान करतं जेणेकरून समाजाच्या आवश्यकता अनुरूप त्या योजनांमध्ये परिवर्तन आणले जाऊ शकते.

६) स्वयंअध्ययनाचे तत्व :- डिजिटल पुस्तकालय मल्टीमीडिया कम्प्युटर दृकश्राव्य साधने इत्यादींच्या प्रयोगाने अध्ययन हा एक नवीन नाविन्यपूर्ण अनुभव होतो. ज्ञानरचनावादाच्या युगामध्ये शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या शिवाय अध्ययन अध्यापन प्रक्रियेची कल्पना करणे कठीण आहे. भिन्नभिन्न प्रकारच्या शैक्षणिक पद्धती या स्वयंअध्ययन सिद्धांतावर आधारित असतात.

७) परीक्षण आणि मूल्यमापन :- शिक्षणाच्या माध्यमातून सामान्य व्यवस्थेच्या संचालनामध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये परीक्षण करण्याच्या हेतूने शैक्षणिक तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावते. वेगवेगळी उपकरणे, विविध पद्धती, विविध सॉफ्टवेअर यांच्या माध्यमातून परीक्षणाची प्रक्रिया अधिक सोयीची होते. कित्येक असे सॉफ्टवेअर आहेत त्यामध्ये परीक्षणच नाही तर परीक्षणानंतरच्या नियोजनामध्येही मदत प्राप्त होते. शैक्षणिक प्रक्रियेमध्ये शिक्षणामध्ये शैक्षणिक तंत्रज्ञान अत्यंत प्रभावी आहे. आजकाल कित्येकजण स्वयंचलित सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सर्व प्रकारचे ज्ञान स्वतःच्या गतीप्रमाणे, आवडीप्रमाणे प्राप्त करत आहेत.

विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात तंत्रज्ञानाची आवश्यकता

१) आनंददायक अध्ययनासाठी :- शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या विविध पद्धती, शैक्षणिक साहित्याचा उपयोग करून शिक्षण अधिक रुचकर आणि सरळ बनवलं जातं. जेणेकरून विद्यार्थ्यांचे अध्ययन सुकर होईल. कोणत्याही विषयाला शिकवण्यासाठी जर आपण चार्ट, मॉडेल, नकाशे यांचा उपयोग करून अध्यापन केलं, तर विद्यार्थ्याला शिकण्यामध्ये रुची निर्माण होते. अध्ययन अधिक स्थायी आणि ग्रहणक्षम होतं. कम्प्युटरच्या साह्याने ॲनिमेशन, स्लाईड शो या द्वारे आपण प्रभावी बनवू शकतो. जेणेकरून विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त ज्ञानेंद्रिय अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये क्रियाशील राखली जाऊ शकतील. त्याचबरोबर शिक्षक विद्यार्थ्यांना संग्रहालयामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतात. विद्यार्थ्यांना इतिहासासारख्या विषयांमध्ये आवडत नाही. परंतु तोच इतिहास जर विभिन्न कहाण्यांच्या, स्लाईडच्या माध्यमातून चित्रांच्या माध्यमातून, रोचक पद्धतीने शिकवला तर विद्यार्थ्यांना त्यामध्ये आवड निर्माण होते.

२) तणाव मुक्त अध्ययन :- शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शिक्षण कार्य बालकेंद्रीत आणि रुची पूर्ण बनवलं जात. यामध्ये विद्यार्थी स्वतः क्रियाशील राहून शिकतो. विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची सक्ती शिस्त वा कुठल्याही प्रकारचा दबाव दिला जात नाही. प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या आवड आणि गतीप्रमाणे शिकू शकतो. शैक्षणिक तंत्रज्ञानामध्ये विद्यार्थ्यांना स्वतः कृती करून शिकण्याची संधी प्राप्त होते. ज्यामुळे त्यांना कृतीचा आनंद मिळतो आणि तणावाचा नाश होतो. याचबरोबर परंपरागत शिक्षण पद्धतीच्या जागेवर खेळाच्या पद्धतीने कठपुतळी असेल किंवा अन्य कुठल्याही मनोरंजनात्मक साधनाच्या द्वारे शिक्षण जर दिले तर शिक्षणामध्ये विद्यार्थी आवडीने सहभाग घेतात. जर कुठला घटक ऑडिओ-व्हिडिओ किंवा कुठल्या तंत्राने शिकवला तर विद्यार्थी आपली क्षमता, आवड आणि गतीनुसार शिकतो. कुठल्याही प्रकारचा तणाव विद्यार्थ्याला राहत नाही.

३) स्वयंअध्ययनास मदत :- शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या उपयोगाने विद्यार्थी शिक्षकाच्या मदतीशिवाय पुस्तक आणि अन्य उपकरणाच्या मदतीने स्वतः अध्ययन करू शकतो. विद्यार्थ्यांना विविध पाठ्यपुस्तकाचे ऑडिओ, पॉडकास्ट, व्हिडिओज, कॅसेट, इंटरनेट किंवा अन्य उपकरणांच्या माध्यमातून स्वयंअध्ययन करण्यासाठी मदत मिळू शकते. ई-लायब्ररी, ईबुक, टॅबलेट, कम्प्युटर, लॅपटॉप या साधनांच्या साह्याने विद्यार्थी कोणतीही पाठ्यसामग्री अभ्यासू शकतात. त्याचा संग्रह देखील करू शकतात.

४) विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी :- शैक्षणिक तंत्रज्ञानाने दृष्टीव्यंग, श्रवणअक्षम, पोलिओग्रस्त अशा विविध विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली जाते. उदाहरणार्थ वर्ड प्रेडिक्शन सॉफ्टवेअर कम्प्युटर आधारित तंत्रज्ञान आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना भाषा समजण्यामध्ये मदत होते. त्याचबरोबर पोर्टेबल व्हाईस सिंथेसायझरच्या मदतीने विद्यार्थी वर्गात प्रश्न विचारले की उत्तर देण्यामध्ये सक्षम होऊ शकतात. इलेक्ट्रिकल व्हीलचेअरच्या मदतीने विद्यार्थी ग्रंथालय विद्यालय या ठिकाणी ये जा करू शकतात. जे विद्यार्थी दृष्टीहीन आहेत अशा विद्यार्थ्यांना डिजिटल व्हॉइस सिंथेसायझरच्या मदतीने विषयाच्या अभ्यासामध्ये मदत होऊ शकते. याच प्रकारे भिन्न प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या साह्याने विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे उपयोग होऊ शकतात.

५) दूर शिक्षणामध्ये उपयोगी :- कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये म्हणून शिक्षकांनी विविध प्रयत्न केले. त्या प्रयत्नाचाच भाग म्हणून झूम, गुगल मिट, youtube आदि माध्यमांच्या साह्याने शिक्षक विद्यार्थ्यापर्यंत पोहचले. विद्यार्थ्यांचे शिक्षण अविरतपणे चालू राहिलं. विद्यार्थी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये असला, तरी विविध दूर शिक्षणाच्या माध्यमातून त्याला शिक्षण प्रक्रियेमध्ये भाग घेता येतो, हे या काळामध्ये लक्षात आलेलं आहे.

स्वानुभव

तंत्रज्ञानाचा शिक्षणात एक प्रभावी हत्यार म्हणून केला जाऊ शकतो हे मी स्वानुभवाने सांगू शकतो. मुलांच्या शैक्षमिक विकासात आणि त्यांच्या विकसनात तंत्रज्ञानाचा किती मोलाचा हातभार लावू शकते याविषयीचा माझा उपक्रम व अनुभव मी आपणासमोर मांडतो.

शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड (QR Coded Books) :-

कोविड-19 (लॉकडाऊनच्या) काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले होते, तसेच शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड देऊन शिक्षण आनंददायी पध्दतीने देण्यासाठी मी 'तंत्रज्ञानाच्या साह्याने प्रभावी शिक्षण/ प्रभावी शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड -QR Coded Books' या उपक्रमाची निवड केली.Youtube, Facebook, Instagram अश्या  सोशल मिडियावर लाखो व्हिडिओ असतात, पण यात वयोगटानुसार आशय नसणे, सर्च करण्यात येणारा अडथळा यामुळे मुले स्वयंध्ययनापासून दूर जातात. परंतु विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष डिजिटल साहित्य ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्हीची "सांगड" घालून जर हाताळता आले व सहाध्यायी पद्धतीने अध्ययन करता आल्यास त्यापासून मिळणारे ज्ञान विद्यार्थ्यास चिरकाल स्मरणात राहील. युट्यूब च्या माध्यमातून ॲनिमेशन, विविध इफेक्टचा वापर करून मनोरंजनात्मक पद्धतीने व्हिडिओ निर्मिती केली. सदर यूट्यूब वरील व्हिडिओ QR कोडद्वारे पुस्तकावर  (Embeded) लिंक करण्यात आला व प्रत्येक पानावर किंवा QR कोड देण्यात आला, व Play Store वरून QR Code ॲपच्या माध्यमातून पुस्तकावरील QR Code स्कॅन करून विद्यार्थी सहजपणे व्हिडिओ पाहू शकतील.

युट्युब वरील व्हिडिओ विद्यार्थ्यांना सहज, कधीही व स्वयंध्ययन पद्धतीने अध्ययन करण्यास उपयुक्त ठरले आहेत.  त्यापासून मिळणारे ज्ञान चिरकाल स्मरणात राहते. तसेच तंत्रज्ञानाच्या (व्हिडिओच्या) माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वयंध्ययन करण्याची संधी निर्माण होते. सदर  शैक्षणिक व्हिडिओ विद्यार्थ्यांना कधीही, कोठेही, विनामूल्य मिळतात व भविष्यात पण मिळतच राहतील. तसेच वाडी,वस्ती, तांड्या व शहरातील हजारो/लाखो विद्यार्थ्यांना शैक्षणिक अध्ययनात फायदा झालेला आहे. एकाच प्लॅटफॉर्मवर शैक्षणिक व्हिडिओज विद्यार्थ्यांना व पालकांना पूर्णपणे मोफत मिळत आहेत. विद्यार्थ्यांचे  श्रवण, भाषण, वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी, विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची माहिती मिळवण्यासाठी शिक्षण आनंददायी बनविण्यासाठी या हेतूने मी या उपक्रमाकची निवड केली. त्याचा प्रचंड सकारात्मक फिडबॅक मला मिळालेला आहे..

               गजानन कोंडीबा चौधरी

(सहशिक्षक जि.प.प्रा.शा.पार्डी खुर्द ता.वसमत जि.हिंगोली



 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने