ब्युरो टीम : शाळा ही समाजाने निर्माण केलेली एक संस्था आहे. फार पूर्वीपासुन आपल्याकडे गुरुकुल पद्धती अस्तित्वात होती. तेव्हांपासून ते आजपर्यंत कालांतराने शाळेच्या बाबतीत अनेक वेगवेगळे बदल होत गेले. पण हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे की शिक्षणात एकदमच क्रांती करता येत नाही, त्यासाठी हळूहळू बदल स्वीकारावे लागतात आणि असे बदल आवश्यकच असतात.
शाळा हे एक संघटन आहे असे मानले तर त्या संघटनांचं व्यवस्थापन याचाच अर्थ नियोजन जर चांगल असेल तर त्या नियोजनाच्या जोरावर शाळा प्रगतीपथावर येऊ शकते. सद्य स्थितीत पाहिले गेले तर वेगवेगळ्या माध्यमांच्या शाळांमध्ये शालेय विकासासाठी शाळा व्यवस्थापन समिती कार्यरत आहेत. शालेय व्यवस्थापन समितीची स्थापनाच शाळा विकास करण्यासाठी झालेली आहे. पण समितीची स्थापना करते वेळी गावातील शिक्षण प्रेमी, शाळेला सतत मदत करण्याची भूमिका घेणारे सदस्य समितीत असायला हवेत. पण गावगाड्याचा विचार करता गट, तट, पक्ष यांचा विचार करून समितीची स्थापना होताना दिसते. हे फार दुर्देवी आहे.
ज्या गावच्या शाळा व्यवस्थापन समित्या उत्तम आहेत. खरोखरच त्या ठिकाणची शाळा सुंदर, स्वच्छ व सर्व सोईसुविधा युक्त असते.शाळेला सर्व भौतिक सुविधा मिळाल्यामुळे याचा परिणाम गुणवत्ता वाढीवर पण दिसून आला आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेशासाठी रांगा लागत असल्याचे आपल्या ऐकण्यात आहे.
शाळा व्यवस्थापन समितीला आपल्या जबाबदार्या व कर्तव्य यांची जाणीव असली पाहिजे. उदा. शाळेमध्ये पटसंख्येनुसार शिक्षक उपलब्ध आहेत का? नसतील तर प्रशासनाकडे पाठपुरावा करून ते उपलब्ध करून घेतले पाहीजेत. तसेच पाण्याची व्यवस्था, मुलां मुलींसाठी स्शतंत्र शौचालय व्यवस्था, ग्रंथालय, वीज पुरवठा, संगणक कक्ष, प्रयोगशाळा इत्यादी भौतिक सुविधा पुरेशा प्रमाणात आहेत का? नसतील तर त्या कशा व कोठून उपलब्ध होतील याकडे लक्ष दिले पाहिजे, अशा सुविधा प्रशासनाकडून लवकरच मिळतीलच असे सांगता येत नाही. त्यासाठी गावातूनच वेगवेगळ्या माध्यमातून लोकवाटा जमा करून सुद्धा आपण भौतिक सुविधा उभ्या करू शकतो. याकडे सरकारकडून सुद्धा अपेक्षा करणे चुकीचे होईल कारण म्हणतात ना, "गाव करील ते राव काय करील ?"
✳️ आदर्श शाळा व्यवस्थापन समिती :-
माझ्या पाहण्यातील हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा आडगाव (रं) शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांच्या सहकार्यातून दरवर्षी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वर्षभर पुरतील इतके रजिस्टर, वह्या, पेन, कंपॉस, लेखनसामग्री, इत्यादी जवळपास सुमारे आठ लक्ष रुपये किंमतीचे साहित्य शहरातील नामांकित स्टेशनरी व्यावसायिकाकडून खरेदी करतात व सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला त्याचे वाटप करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत कोणताच अडथळा येत नाही.
या शाळेतून भावी प्रशासकीय IAS, IPS अधिकारी घडावीत या उद्देश्याने शाळेतून शिकून गेलेल्या माजी विद्यार्थ्यांनी SMC च्या माध्यमातून शाळेला सुमारे 25000/- रु. किंमतीची स्पर्धा परीक्षेचे पुस्तके भेट स्वरुपात दिली आहेत. याचा फायदा शाळेतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व मुलांना झाला आहे. याचीच फलनिष्पत्ती अशी होत आहे की मागील काही शैक्षणिक वर्षात नवोदय, पाचवी शिष्यवृत्ती , आठवी शिष्यवृत्ती, NMMS व इतर स्पर्धा परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.यामुळेच वसमत विधानसभेचे आमदार आदरणीय श्री. चंद्रकांत ऊर्फ राजुभैय्या नवघरे यांनी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत जि.प.प्रा.शा. आडगांव च्या आडगाव पॅटर्न चा गौरवोल्लेख केला आहे.
समाज आणि शाळा यांच्या परस्पर संबंधावरच शाळेची गुणवत्ता अवलंबून असते. त्या दृष्टीकोनातूनच विविध समित्यांची स्थापना केलेली असली तरी शालेय व्यवस्थापन समिती फारच महत्वाची असते. कारण शाळा स्तरावर ज्या वेगवेगळ्या समस्या असतात त्यांची चर्चा करून त्या येथेच सुद्धा सोडवल्या जाऊ शकतात. वेळेचा सुद्धा अपव्यय होणार नाही. पण त्या प्रकारची निर्णय घेण्याची क्षमता असणारी समितीची स्थापना झाली पाहीजे. हे निवड करतेवेळी लक्षात ठेवायला हवे.
राज्य घटनेतील ४५ कलमानुसार वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत देशातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यासाठी शासन तर प्रयत्नांची पराकाष्ठा करतच आहे. त्यासाठी पूर्वी शाळा स्तरावर ग्रामशिक्षण समिती शाळेचे नियोजन करायची. पण RTE Act-२००९ नुसार १७ जून २०१० च्या शासन परिपत्रकानुसार आपल्याला शाळा व्यवस्थापन समित्या स्थापन करायला सांगीतल्या आहेत.
समाज आणि शाळा एकाच नाण्याच्या दोन विलंबित बाजू आहेत. आजचा समाज काल शाळेत होता. आज जे शाळेत आहेत तो उद्याचा समाज आहे. उद्याचा समाज समर्थ व्हावा असे वाटत असेल तर आजची शाळा सक्षम होणे आवश्यक आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ सरकारी धोरणांवर अवलंबून न राहता गावाने शाळेच्या विकासाच्या पालखीला खांदा दिला पाहिजे. ते काम शाळा व्यवस्थापन समिती अतिशय चोखपणे बजावू शकते.
श्री.गजानन कोंडीबा चौधरी
सहशिक्षक
जि.प.प्रा.शा.पार्डी खुर्द
ता.वसमत जि.हिंगोली
टिप्पणी पोस्ट करा