Sanjay kakade : संजय काकडेंचा पक्षातील नेत्यांना घरचा आहेर; नेमकं प्रकरण काय?

 


ब्युरो टीम :गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकारणाची पातळी घसरत चालली आहे. राज्यातील नेते टीका करताना कोणतेही तारतम्य बाळगताना दिसत नाहीयेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात आहे.

नुकतेच भाजपचे नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. यावर आता खुद्द भारतीय जनता पक्षाच्याच नेत्याने जाहीर टीका केली आहे.

निलेश राणेंनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले होते की, "निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात, कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार". या टीकेमुळेच पक्षाने नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यावर बंदी आणावी, अशी मागणी भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी केली आहे. पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार संजय काकडे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी काकडे म्हणाले, पक्षातील जे काही वाचाळवीर मंडळी आहेत अशा लोकांना सांस्कृतिक पक्ष असलेल्या आमच्या भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर बंदी आणावी. तसेच याबाबत मी वरिष्ठांना पत्र देखील पाठवत आहे. त्यांच्याकडे मागणी देखील करणार आहे. अशा वक्तव्याने काही समाज भाजपपासून दूर चालला आहे. यामुळे पक्षाला धोका होऊ शकतो असंही काकडे यावेळी म्हणाले.

निलेश राणेंनी जे वक्तव्य केलं आहे त्याबाबत काकडे म्हणाले की, अशा या वक्तव्याने पक्षाचीच प्रतिमा मलिन होत आहे. अशा ज्येष्ठ नेत्यांच्या बाबतीत बोलणं हे पक्षाच धोरण नाही. कोणीही असे वक्तव्य करू नये असं देखील यावेळी काकडे म्हणाले.


शरद पवारांना धमकी....राज्यात जे चाललं आहे ते खोडसाळपणा-


गेली काही दिवस राज्यातील काही जिल्ह्यांत तणावाची स्थिती असताना चिंता वाढविणारी बातमी समोर आली आहे. तुमचा दाभोळकर करू अशी शरद पवारांना 'ट्विटवरून धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणाची खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीरपणे दखल घेत मुंबई पोलीस आयुक्ताकंडे केली तक्रार केली आहे. यावर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार संजय काकडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अशी जर धमकी आली असेल त्याचा भाजपशी काहीही संबंध नाही. ज्याने धमकी दिली आहे त्याच्यावर कठोर कारवाई होईल. पवार साहेब यांचं कोणीही शत्रू नाही. ज्याने धमकी दिली आहे त्याने खोडसाळपणा केलेला आहे. राज्यात जे काही चाललेलं आहे ते सगळं खोडसाळपणा असून राज्याचे गृहमंत्री सक्षम असून संबंधितांवर कारवाई होईल असे यावेळी काकडे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने