Sant tukaram palakhi : श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शनिवारी दुपारी २ वाजता प्रस्थान

 


ब्युरो टीम : येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शनिवारी दुपारी दोन वाजता प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे यांनी दिली.

यावेळी संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख अजित महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे उपस्थित होते. पालखी सोहळ्याच्या प्रस्तानासाठी उपस्थित राहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भाविक देहू नगरीत येऊन दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार व पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.

पालखी प्रस्थान सोहळा कार्यक्रम- पहाटे ५ वाजता श्री विठ्ठल रुख्मिनी देवता, श्री संत तुकाराम महाराज महापूजा व शिळामंदिर पूजा पालखी सोहळा प्रमुख व संस्थानचे अध्यक्ष आणि विश्वस्त यांच्या हस्ते होईल.

पहाटे ५.३० वाजता तपोनिधी नारायण महाराज पालखी सोहळ्य़ाचे जनक यांच्या समाधीची महापूजा संस्थानच्या अध्यक्ष व विश्वस्थांच्या हस्ते होईल. सकाळी १० ते १२ वाजता पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे काल्याच्या किर्तन होईल. सकाळी ९ ते ११ वाजता तुकोबारायांच्या पादुकांचे पूजन, महापूजा इनामदार वाड्यात होईल. दुपारी २ वाजता पाललखी प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमास सुरवात होईल. पालखी प्रस्थान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न होईल. सायंकाळी ५ वाजता पालखी मुख्य मंदिर प्रदक्षिणेसाठी भजनी मंडपातून बाहेर पडेल. सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास पालखी पहिल्या मुक्कामासाठी इनामदार वाड्यात जाईल. तेथे सायंकाळची मुख्य आरती होईल.

आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज झाली असून यंदा वारीमध्ये स्वच्छतेला महत्त्व दिले असून त्या दृष्टीने श्री संत तुकाराम महाराज संस्थान व नगरपंचायत प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. विद्यूत व्यवस्था करण्यात आली आहे. नदीच्या घाटावर आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी एनडीआरएफची एक तुकडी २४ तास लक्ष ठेवून असणार आहे. जीवरक्षकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय प्रासंगिक कामे मात्र सुरुच राहणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने