Shahu maharaj : लोककल्याणकारी राजा- छ.शाहू महाराज



ब्युरो टीम : खरं तर आजही आम्ही या महाराष्ट्राचा उल्लेख शाहू- फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र असा करतो. ज्या महापुरुषाने छ. शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील रयतेचे राज्य निर्माण केले व ज्यांना छ. शिवरायानंतर "जाणता राजा" म्हणून गौरविण्यात आले ते छत्रपती शाहू महाराज होय. आज २६ जुन छत्रपती शाहू महाराजांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या कार्यास उजाळा.


ज्या काळात जातीभेद, धर्मभेद प्रचंड प्रमाणात पसरलेले होते. सर्वत्र उच्चवर्णिय कनिष्ठ जातीतील लोकांवर जुलुम करत होते. दलित, बहुजन वर्गाला तर खुपच हलाखीचे जीवन जगावे लागत होते. सर्वत्र अंधकार पसरला होता. अशा काळात दलीत, बहुजन आदिवासी लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठीं छत्रपती शाहू महाराजांनी समतचे राज्य कोल्हापुर संस्थानात निर्माण केले. समाजातील जातीभेदाला मूठमाती देऊन चातुवर्ण व्यवस्थेला शाहु महाराजांनी कडाडून विरोध केला. आपल्या दरबारात बहुजन, दलित, आदिवासी, पारधी लोकांना मानाने वागणूक दिली.शाहु महाराजांचे वर्णन डॉ. बाबासाहेब आंबडेकर करताना म्हणतात - "संविधानापूर्वी संविधानाची अंमलबजावणी करणारा थोर राजा म्हणजे छ. शाहु महाराज होय." आरक्षणाचे जनक" म्हणुन शाहु महाराजांना ओळखले जाते. राज्याभिषेकावेळी शाहू महाराजाचे वय अवघे २० वर्ष होते. पण शाहु महाराजानी राज्यकारभार असा केला कि आजही आदर्श राज्यकारभार कसा करावा याचे उदाहरण द्यायचे झाल्यास शाहू महाराज यांचे नाव निघते. त्यांनी कोल्हापूर संस्थानात विविध सुधारणा केल्या. रस्ते, विवीध तलाव तसेच राधानगरी धरण बांधले. शिक्षण संस्था निर्माण करून गोरगरीब, मागासवर्गीय, पिडीत मुले, मुली यांना शिक्षणाची दारे खुली केली. शिष्यवृत्ती जाहीर करुन गोरगरीब विद्यार्थीना मदत केली. विवीध वस्तीगृह उभारले. युवकांना शरीर संवर्धनासाठी त्या काळात कुस्ती खेळाला शाहू महाराजांनी पाठबळ दिले. कोल्हापुरमधे शाहुपुरी पेठ वसवली. उद्योगधंदेना प्रोत्साहन दिले. राज्यकारभारात मागासवर्गीयांना, बहुजनांना, पारधी समाजस प्राधान्य दिले. दलित तरूण गंगाराम कांबळे यास चहाचे हॉटेल सुरु करुन दिले व स्वतः गंगाराम या दलीत युवकाच्या हाताने बनवलेला चहा पिऊन जातीभेदाची बंधने झूगारून दिली. समाजाला स्वतःच्या कृतीने जात, धर्म, भाषा, पंथ, प्रांत हे भेद नष्ट करा व माणूस म्हणून जगा हा मंत्र त्यांनी दिला. त्या काळात प्लेगची साथ आली.प्लेगने कुटुंबची कुटुंब उध्वस्त होवु लागली. लोक पटपट मरू लागली. प्लेगने कोरोना पेक्षा हि भयंकर हाहाकार माजवला. याच काळात शाहू महाराजानी संपुर्ण कोल्हापुर संस्थान लॉकडाऊन केले. लोकांना राहण्याची, अन्नाची सोय करुन लोकांचे प्राण वाचवले. खरं तर शाहू महाराजांनी प्लेग काळात केलेले नियोजन कोरोना काळात उपयुक्त ठरले असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. खरं तर क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचे सत्यशोधक समाजाचे कार्य छ. शाहु महाराजांनी पुढे चालवले. त्यांनी स्रीयांचा सन्मान केला. अंधश्रध्देला त्यांनी कडाडून विरोध केला.आदर्श राजा कसा असावा व आदर्श राज्यकारभार कसा करावा याचे मुर्तीमंत उदारण म्हणजे छ. शाहू महाराज होय. आज काळ बदलत चाललाय. जातीभेद, धर्मभेद प्रचंड प्रमाणात वाढू लागलेत. सगळीकडे अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, अंधश्रध्दा वाढतायत. खरंतर आज गरज आहे ती छत्रपती शाहू महाराजांच्या समतेच्या बंधुतेच्या विचाराची. राष्ट्रपुरुषाचे विचार हे आचरणात आणले तर नक्कीच राष्ट्र सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. शाहु महाराजांनी पेटवलेली हि समतेची मशाल कायम धगधगती तेवत ठेवूया.


लेखक - महेंद्र मिसाळ  - सुप्रसिद्ध व्याख्याते व लेखक 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने