Udayanraje Bhosale:शिवराज्याभिषेक दिनावरून उदयनराजेनी खा. तटकरेना फटकारले

 



 ब्युरो टीम : शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्ताधारी पक्षातील अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. मात्र, या सोहळ्यात मानापमानाचे नाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनील तटकरे हेही या कार्यक्रमांना उपस्थित होते. मात्र, संधी डावलल्याचा दावा करत ते मधेच कार्यक्रम सोडून रायगडावरून खाली उतरले. यावर आता उदयनराजे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

एक शिवभक्त नागरिक म्हणून इथे आलो होतो. शिवराज्याभिषेक सोहळा पूर्ण होईपर्यंत शिवभक्त मावळा म्हणून उपस्थित होतो. पण नंतरचा कार्यक्रम जरा राजकीय होता. या विभागाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करतो. एक शिवभक्त म्हणून माझ्या भावना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करण्याची राजशिष्टाचारानुसार असणारी माझी संधी का डावलली गेली? मला माहिती नाही, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. यावर उदयनराजे यांनी प्रतिक्रिया दिली. 

सुनील तटकरे आता कुठल्या पक्षात आहेत?

उदयनराजे म्हणाले की, सुनील तटकरे आता कुठल्या पक्षात आहेत? हा कार्यक्रम शासकीय नसता, राजकीय असता तर त्यांना कार्यक्रमाला बोलवले असते का?, या शब्दांत उदयनराजे यांनी भाष्य केले आहे. तसेच विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेवर बोलताना, या लोकांचे कुणी हात पकडले होते का? कुणी थांबवले होते का? छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही नाव घेता, पण असे कार्यक्रम तुम्ही घेत नाही. तुमचा नाकर्तेपणा किंवा आळशीपणा लपवण्यासाठी एखादा मनापासून असा कार्यक्रम नियोजित करत असेल, तर नाव ठेवण्याचे काय कारण? तुम्ही करा ना? तुम्हाला कुणी थांबवले होते का? असे उलटप्रश्न उदयनराजेंनी केले आहेत. 

दरम्यान, लवकरच हे सरकार पडेल, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. यावर बोलताना, तुम्ही बघताय, चाललेय व्यवस्थित. काहीतरी बोलले पाहिजे ना. नाहीतर आज जे लोक त्यांच्याबरोबर आहेत, हळूहळू त्याला गळती लागेल. मग त्यांना थांबवण्यासाठी काहीतरी बोलणे गरजेचे आहे. मी त्यांच्या जागी असतो, तर मीही हेच केले असते, अशी टीका उदयनराजे यांनी केली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने