Ahmednagar Crime : निवृत्त लष्करी जवानाच्या खूनप्रकरणी दोघांना अटक, आरोपीत संपादकाचा समावेश


ब्युरो टीम : अहमदनगर जवळील बोल्हेगाव परिसरातून एक निवृत्त लष्करी जवान बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह लोणी (ता. राहाता) परिसरात आढळून आला होता. अखेर या निवृत्त जवानाचा खून झाल्याचे समोर आले आहे. विठ्ठल नारायण भोर (वय 48, रा. गणेश चौक, बोल्हेगांव, ता. नगर) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी मनोज वासुमल मोतीयानी (वय 33, रा. सावेडीगांव, अहमदनगर) व  स्वामी प्रकाश गोसावी (वय 28, रा. सावेडीगांव, अहमदनगर)  अशा दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. यातील मनोज मोतीयानी हा अहमदनगर येथील एका दैनिकाचा संपादक असल्याची माहिती आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल, रविवार (३० जुलै) रोजी लोणी ते तळेगांव रोडवर गोगालगांव शिवारात एका अनोळखी इसमाचा अज्ञात कारणासाठी छातीवर भोसकून अज्ञात हत्याराने खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सदर घटनेबाबत लोणी पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरची घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांचे पथक नेमून गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेश दिले होते. त्यानुसार दिनेश आहेर यांनी पोलीस उप निरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार,देवेंद्र शेलार, पोलीस नाईक रविंद्र कर्डीले, विजय ठोंबरे, विशाल गवांदे, फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत जाधव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमण्यात आले होते.

सीसीटीव्ही फुटेजवरून केला तपास

पथकाने घटना ठिकाणास भेट देवुन माहिती घेतली असता पथकास घटना ठिकाणी एका चारचाकी वाहनाचे टायर मार्कस् दिसुन आले. त्या आधारे पथकाने आजुबाजूचे सीसीटीव्ही फुटेज व तात्रिंक विश्लेषणाचे आधारे पुढील तपास सुरु केला. पथकास सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक पांढरे रंगाची कार येताना व लागलीच जाताना दिसुन आली. पथक त्या अनुषंगाने तपास करत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना 29 जुलै 2023 रोजी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये  विठ्ठल नारायण भोर या व्यक्तीची मिसिंग दाखल झाल्याची महिती मिळाली.  सदर मिसिंगमधील व्यक्ती व अनोळखी मयत इसम यांचे वर्णन मिळते जुळते असल्याचे निदर्शनास आल्याने,  आहेर यांनी पथकास तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना सोबत घेवुन मिसिंग इसमाबाबत सविस्तर माहिती घेणेबाबत मार्गदर्शन केले. पथकास मिसिंग इसम नामे विठ्ठल भोर यांचे बाबत माहिती घेत असताना त्याचे आरोपी मनोज मोतीयानी यांचे बरोबर प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवहार असुन त्यावरुन दोघामध्ये वाद झाले असले बाबत माहिती मिळाली. 

सदर महितीचे अनुषंगाने पथकाने मनोज मोतीयानी (रा. सावेडीगांव, अहमदनगर) याचा शोध घेतला. परंतु तो पांढरे रंगाची हुंडाई कार मधुन त्याचा साथीदार नामे स्वामी गोसावी यास सोबत घेवुन गेल्याची माहिती प्राप्त झाली. त्या आधारे नाशिक येथे नातेवाईकांकडे चौकशी करता तो भोपाळकडे निघाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सेंधवा, मध्यप्रदेश राज्य येथे जावुन आरोपींचा शोध घेता तो मिळुन आल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. आरोपींकडे गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी मयत विठ्ठल भोर यांचा खून केल्याचे कबूल केले.

म्हणून केला खून

मयत विठ्ठल भोर  व मनोज मोतीयानी यांचे प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवहारावरून 29 जुलै 2023 वाद झाले होते. अखेर आरोपी मोतीयानी याने त्याच्या चारचाकी गाडीमध्ये निंबळक ( ता. नगर)  साथीदार स्वामी गोसावी याचे भोर यांच्या  छातीवर स्क्रुड्रायव्हरने वार करुन त्यांचा खून केला, व मयत भोर यांचे प्रेत लोणी परिसरातील पेट्रोलपंपा जवळ फेकुन दिले. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. सदर कारवाई पोलीस अधिक्षक  राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या सूचना  व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

पोलिसांनी नेमकं काय सांगितलं? पहा व्हिडिओ



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने