Ahmednagar - pune : पुण्यात मेट्रोचा विस्तार झाला, नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे कधी? खासदार विखेंनी स्पष्टच सांगितलं



विक्रम बनकर, नगर :  पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो सेवेचा बहुप्रतीक्षित विस्तार अखेर एक ऑगस्टपासून होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक ऑगस्टला या विस्तारित कामाचे उद्घाटन होणार आहे. या निमित्ताने मात्र पुन्हा एकदा नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेचा प्रश्न समोर आला असून गेल्या वीस वर्षापासून रखडलेला हा प्रश्न केव्हा सुटणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यातच आता याबाबत नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

नगर-पुणे मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा असते. या मार्गावर इंटरसिटी रेल्वे व्हावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. विविध संघटनेच्या वतीने यासाठी अनेकदा निवेदन देणे, आंदोलन करणे, असे प्रकार घडलेले आहेत. त्यातच आता पुणे येथे मेट्रोचा विस्तारी वेगाने होत आहे. मात्र दुसरीकडे अनेक वर्षापासून रखडलेला नगर पुण्याचा इंटरसिटी रेल्वेचा प्रश्न सुटताना दिसत नाही. यावरून आता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना सुद्धा लक्ष्य करण्यात येऊ लागले आहे. मात्र त्यातच खासदार विखे यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

खासदार विखे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं की, 'या प्रश्नाबाबत मागील आठवड्यात रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत एक बैठक झालेली आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून रखडला आहे, हे काही नाकारता येणार नाही. आत्तापर्यंत डबलिंगचं काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु ते अद्याप न झाल्याने हा प्रश्न रखडला आहे. मला असा विश्वास आहे की, येणाऱ्या महिन्यात याबाबत सकारात्मक निर्णय केंद्र सरकारकडून येईल, त्यानंतर ट्रायल बेसिसवर नगर ते पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू होईल. ट्रायल बेसिस वर सुरू असणाऱ्या इंटरसिटी ट्रेनला जर नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, तर भविष्यात सुद्धा ही ट्रेन सुरू राहण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो,' असेही ते म्हणाले.


पहा व्हिडिओ:



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने