ब्युरो टीम : नगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्यावर सावेडीतील एकविरा चौकात शनिवारी (ता. १५) रात्री उशिरा प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सावेडी उपनगरातील भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे याच्यासह पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नगर शहरातील एकविरा चौकात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेले चत्तर यांच्यावर काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या आठ ते दहा जणांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अंकुश चत्तर गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
स्वप्नील शिंदे, अभिजित बुलाख, सुरज कांबळे, बिभ्या कांबळे, महेश कुर्हे, राजू फुलारी या मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विदर्भातून ताब्यात घेतले. काल (रविवारी) चार संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर व तांत्रिक पुराव्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपींचा शोध घेत त्यांना जेरबंद केले.
दरम्यान, अचानक घडलेल्या या घटनांमुळे परिसरात मोठा गोंधळ व तणाव निर्माण झाला आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा