Ajit pawar : 'या' आमदारांची समजूत काढणं अजित पवार यांच्यासाठी मोठं आव्हान



ब्युरो टीम : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा तिढा अनेक बैठका आणि चर्चानंतर अखेर सुटला आहे. पावसाळी अधिवेशनानंतर हा विस्तार होणार असल्याची माहीती आहे. तर खाते वाटप आज किंवा उद्या केलं जाणार आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वच इच्छुकांचं लक्ष लागलं आहे. नव्या विस्तारात तिन्ही पक्षाच्या वाट्याला कमी मंत्रिपदं येणार आहेत. राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण, १२ दिवस उलटले तरी सुद्धा या मंत्र्यांना खात्याचं वाटप झालेले नाही. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत आलेल्या आमदारांच्या पदरी निराशा आली आहे. अजित पवार यांच्यासोबत आलेले आमदार अचानक तटस्थ भूमिकेत असल्याची माहिती आहे. 

मंत्रिमंडळातील खात्याच्या अपेक्षेने आलेल्या दोन आमदारांनी तटस्थ भूमिका घेतल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळाच्या खात्याची शाश्वती मिळाली, तरच आम्ही आमची भूमिका जाहीर करू, असं या आमदारांनी ठामपणे सांगितल्याची माहीती आहे. आमदारांच्या या भूमिकेमुळे अजित पवारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी बंड करत युती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. अजितदादांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. अशातच आपल्यासोबत आलेल्या अनेक आमदारांना अजित पवार यांनी काही ना काही आश्वासन दिल्याची माहिती आहे.

महायुतीत जावून काहीच दिवस झाले असतानाच अजित पवार यांच्या गटात धुसफूस निर्माण झाली आहे. मंत्रिपद मिळत नसल्याने माणिकराव कोकाटे, अतुल बेनके आणि किरण लहामटे या तीन आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहीती आहे. या तिन्ही आमदारांनी वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तेत वाटा मिळत नसल्याने हे तिन्ही आमदार नाराज आहेत.राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादीचे अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहे, त्यातच दोन आमदारांनी अजित पवार यांना महामंडळाच्या खात्याने पाठींबा दिला होता. आता या खात्यांवरून तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू असल्याने हे दोन्ही आमदार नाराज झाले असून त्यांनी तटस्थ भूमिका घेतल्याची माहिती आहे.

महामंडळाच्या खात्याची शाश्वती मिळाली, तरच आम्ही आमची भूमिका जाहीर करू, असं या आमदारांनी ठामपणे सांगितल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. याबाबातचे वृत्त 'टिव्ही ९ मराठी'ने दिले आहे. या तटस्थ भूमिकेमागे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप आणि ज्यांच्या मागे चौकश्यांचा ससेमिरा आहे, अशा नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. ज्यांनी अनेक वर्ष मंत्रिपदं मिळालेली आहेत, अशा आमदारांनाच पुन्हा मंत्रिपदे देण्यात आली आहेत. त्यामुळे या आमदारांमध्ये नाराजी आहे. 

शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या राष्ट्रीय नेत्याला सोडून आल्यानंतरही सत्तेत वाटा मिळत नसल्यामुळे वेगळी भूमिका घेणच योग्य असं या आमदारांचं म्हणणं आहे. त्यामुळे या आमदारांची समजूत काढणं अजित पवार यांच्यासाठी मोठं आव्हान ठरणार आहे. अजित पवार आणि हे नेते काय भूमिका घेणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने