Ajit Pawar : पंतप्रधान मोदींचे एक ट्वीट, अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा करणाऱ्या 'त्या' गटाची हवाच निघाली



ब्युरो टीम :  'महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमधून ट्वीट केले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदे यांचे राज्याच्या राजकारणातील वजन व प्रतिष्ठा आणखी वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदावरून कोणत्याही क्षणी उचलबांगडी होईल, अशी कुजबूज करत असलेल्या राज्यातील एका राजकीय गटाला हा मोठा धक्का असल्याचे समजले जात आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून राजकीय वर्तुळातील एक गट सातत्याने एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदावरून कोणत्याही क्षणी उचलबांगडी होईल, अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू होती. अजित पवार यांच्या एका समर्थक आमदाराने तर अजित पवार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत असे ट्वीटही केले होते. साहजिकच एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. हे सर्व सुरू असताना शनिवारी (22जुलै) एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीचे फोटोही व्हायरल झाले.

या भेटीनंतर शिंदे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. 'पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या नरेंद्र मोदी यांनी माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली. माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला', असे शिंदे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.



दरम्यान, 'महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे', असे त्यांनी मराठीमधून ट्वीट केले. पंतप्रधानांनी मराठीमधून ट्वीट करत शिंदे यांच्या कामाचे कौतुक केल्याने आता शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, गे मात्र स्पष्ट झाले आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने