ब्युरो टीम: २ जुलै रोजी राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे दिसत आहे. काही नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात आहेत, तर काही नेते खासदार शरद पवार यांच्यासोबत थांबले आहेत.
या फुटीनंतर आता पक्षात मोठे बदल करण्यात येत आहेत.
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे प्रचार प्रमुखपद देण्यात आले आहे. या संदर्भात राष्ट्रवादीच्या ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे.
खासदार अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्या मंत्रिपद शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते,पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा वाय बी चव्हान सेंटरमध्ये मेळावा झाला होता. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हे यांनी पक्षाच्या प्रचार प्रमुखाची ऑफर दिली होती.
एनसीपीच्या ट्विटर हँडलवरुन ही माहिती दिली आहे. 'पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मान्यतेने आगामी निवडणुकांकरिता खा. डॉ. अमोल कोल्हे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचार प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. आज मा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते खा. डॉ. अमोल कोल्हे यांना सदर नियुक्तीचे पत्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र प्रभारी खा. सुप्रियाताई सुळे, कोषाध्यक्ष माजी आमदार हेमंत टकले, पालघर जिल्हा अध्यक्ष आमदार सुनील भुसारा, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे, मुंबई कार्याध्यक्ष राखी जाधव, युवक प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख, विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक प्रदेश उपाध्यक्ष अमोल मातेले हे उपस्थित होते, असं ट्विट केलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा