annabhau sathe: साहित्यसम्राट- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे


ब्युरो टीम: आजकाल शिक्षण क्षेत्रात विविध शिक्षण संस्था निर्माण झाल्या आहेत. पदव्या मिळवून विदयार्थी विविध श्रेत्रात नोकरी, व्यवसाय मधे यश मिळवतात. शिक्षणाने माणसाची जगात वेगळी ओळख निर्माण होते.पण शिक्षण न घेता जगात स्वतःचे नावं साहित्य सम्राट म्हणून अजरामर करणारे एक रत्न याच महाराष्ट्रात जन्माला आले ज्यांनी दिड दिवस शाळेत जावुन "साहित्यरत्न" म्हणुन जगात नावलौकिक मिळवला. अनेक कथा, कादंबरी,लोकगीत, पोवाडे, रचत या महामानवाने समाजातील अन्याय  विरोधात आवाज उठवला या महापुरुषांचे नाव होते- "साहित्यरत्न" अण्णाभाऊ साठे. आज (१ ऑगस्ट )अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा होत आहे. त्या निमित्त अण्णांच्या पवित्र कार्यास उजाळा.

सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे अण्णांचा जन्म १ ऑगस्ट १९२० साली झाला. मातंग समाजात जन्मलेले तुकाराम हा भविष्यात अण्णाभाऊ बनून आपल्या समाज बांधवांच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊन जगात साहित्यसम्राट म्हणून नावारूपास येईल असे कोणास वाटलेही नसेल. बालपणापासूनच अण्णांना जाती व्यवस्थेचे चटके बसले. समाजात जाती धर्मात प्रचंड भेद होते. उच्च नीच , गरीब श्रीमंत, काळा गोरा असे भेद होते. उच्चवर्णीय अस्पृश्य समाजावर अन्याय करत होते. अण्णांनी दीड दिवस शाळेत जावुन साहित्य सम्राट बनता येते हा नवा इतिहास  जगा समोर मांडला. समाजातील अन्याय विरोधात त्यांनी आपल्या लेखणीदवारे वाचा फोडली. तुकाराम ते अण्णाभाऊ हा प्रवास सोपा नव्हता. अण्णांना खुपच संघर्ष करावा लागला.अण्णांनी विविध साहित्य लेखन केले. त्यांनी आयुष्यात ३५ कादंबऱ्या अनेक लघुकथा, लावण्या, पोवाडे लिहली.त्यांच्या "फकिरा" कादंबरीस राज्य शासनाचा उत्कृष्ट कादंबरी हा पुरस्कार मिळाला होता. "अकलेची गोष्ट, कृष्णा काठच्या कथा, वारणेचा वाघ" अशा अनेक कादंबऱ्या त्यांनी लिहल्या.

त्यांचे "माझा रशियाचा प्रवास" हे प्रवासवर्णन अतिशय गाजले.शाहिर अमर शेख सोबत त्यांनी "लाल बावटा" कला पथक स्थापन केले. कामगारांना न्याय व त्यांचे हक्क मिळावेत म्हणून अण्णानी नेहमीच संघर्ष केला. गिरणी कामगारांच्या प्रश्नासाठी त्यांनी लढा दिला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांनी उच्चवर्णियांचे भारतावरील शासन मान्य नाही म्हणून या विरोधात २०,००० लोकांचा मोर्चा काढून "ये आजादी झूठी है, देश कि जनता भूखी है" अशा घोषणा दिल्या. साहित्य संमेलनात अण्णा विचार मांडताना म्हणतात - "पृथ्वी हि शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित, कामगार लोकांच्य तळ हातावर तरलेली आहे." यातून त्यांनी कामगार वर्गाचे महत्व वर्णन केले. अण्णांनी बाबासाहेब आंबेडकराना श्रद्धांजली अर्पण करताना "जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मज भीमराव" असे गीत गायले. आपले सहित्य लेखन त्यांनी दलित, कामगारांच्या प्रश्नासाठी, हक्कासाठी लिहले. अण्णाचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा  देणारे ठरले. अण्णांच्या जीवनावर विविध पुस्तके, चित्रपट निर्माण केली गेली.

अण्णानी समाजासाठी केलेला संघर्ष नेहमीचं आम्हाला जगण्यास प्रेरणा देत राहिल. त्यांचे साहित्य लेखन हे समाजास नेहमीच उपयुक्त ठरेल. समाजामधील जाती धर्मातील भेद नष्ट करण्यासाठी अण्णांचे  विचार कायमचं दिशादर्शक ठरतील.

लेखक - महेंद्र मिसाळ (सुप्रसिद्ध व्याख्याते व लेखक)


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने