Balasaheb thorat : "INDIAबाबत पंतप्रधान मोदींनी अशी टीका करणे योग्य नाही"; बाळासाहेब थोरातांचे प्रत्युत्तर



ब्युरो टीम : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी NDA आणि विरोधकांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकल्याचे पाहायला मिळाले. भाजपविरोधी विरोधकांच्या या नव्या आघाडीला INDIA असे नाव देण्यात आले आहे.

विरोधकांना चितपट करत शक्तिप्रदर्शन करण्यासाठी NDA नेही कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. देशभरातील ३८ पक्ष एनडीएसोबत असून, २६ पक्षांनी विरोधी गट इंडियाला पाठिंबा दिला. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी INDIA वर जोरदार टीका केली असून, राज्यातील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. 

विरोधक विखुरलेले आहेत. हताश आहेत. त्यांना आणखी बराच काळ सत्तेत येण्याची इच्छा नाही, असे त्यांचा दृष्टीकोन पाहता दिसते. केवळ 'इंडिया' नाव ठेवल्यानं होत नाही. ईस्ट इंडिया कंपनीनेही 'इंडिया' लावले होते आणि इंडियन मुजाहिदीनच्या नावातही 'इंडिया' आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. यावर आता विरोधकांकडून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली असून, राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी यावर भाष्य केले आहे. 

INDIAबाबत पंतप्रधान मोदींनी अशी टीका करणे योग्य नाही

पंतप्रधानांनी अशी टीका करणे योग्य नाही. पंतप्रधानपद हे मोठे पद आहे. पंतप्रधान देशाचे प्रमुख असतात. असे असताना विरोधकांनी एकत्र येऊन इंडिया संघटना स्थापन केली. त्यावर अशा प्रकारे शेरेबाजी करणे योग्य नाही, असा पलटवार केला. तसेच विरोधी पक्षनेतेपद लवकरच निश्चित करण्यात येईल. पोलिसांविषयी देखील अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे सरकार निर्णय घेत आहे. आमचा त्याला विरोध आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, तुम्हाला हवे ते आम्हाला बोला. पण आम्ही भारत आहोत. आम्ही मणिपूरमधील परिस्थिती ठीक करण्यासाठी मदत करू आणि प्रत्येक स्त्री आणि मुलाचे अश्रू पुसू. आम्ही तेथील सर्व लोकांसाठी प्रेम आणि शांती परत आणू. तसेच आम्ही मणिपूरमध्ये भारताच्या कल्पनेची पुनर्बांधणी करू, या शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या टीकेवर हल्लाबोल केला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने