ब्युरो टीम : अन्नामलई कुप्पुसामी हे 2011 सालच्या बॅचचे पोलीस सेवेतील सनदी अधिकारी आहेत. सरकारी नोकरीत त्यांनी आठ वर्षे काढली आणि त्यानंतर 2019 मध्ये दक्षिण बंगळुरूच्या पोलीस उपायुक्तपदाचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि ते त्या पक्षाचे उपाध्यक्ष झाले.
दोन वर्षांपूर्वी त्यांना तमिळनाडू विधानसभेचे तिकीट मिळाले; परंतु द्रमुकच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला. पोलीस सेवेत असताना “सिंघम’ म्हणून अन्नामलई प्रसिद्ध होते.
राजकारणात ते नवखे असले, तरी आज ते तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. दहा महिन्यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकांत आधीपेक्षाही अधिक यश मिळवण्याचा इरादा भाजपने निश्चित केला आहे. भाजपचा पराभव करण्याच्या हेतूने कॉंग्रेसप्रणीत “इंडिया’ आघाडीची मोर्चेबांधणी सुरू असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “तिसऱ्यांदा आम्हीच सत्तेत येणार’, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. काहीजणांना कोणत्याही चांगल्या कामात अडथळे आणण्याची सवयच जडली आहे, असा टोला लगावून, भारताला जगात अव्वल तीनमध्ये आणण्याचा निर्धार मोदींनी व्यक्त केला आहे. विरोधी पक्षांना 2024 नंतरही विरोधातच बसायचे आहे, असे उद्गार मोदीजींनी काढले असले, तरीही त्यासाठी भाजपला खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. विशेषतः दक्षिणेतील राज्यांत भाजपचे जवळपास नामोनिशाण नाही. तेथे थोड्याफार तरी जागा मिळवाव्या लागतील. यादृष्टीने तमिळनाडूचे महत्त्व विशेष आहे.
तमिळनाडू हे मोठे राज्य असून, अण्णाद्रमुकच्या साथीने भाजप तेथे प्रयत्नांची शिकस्त करू शकतो. यादृष्टीनेच अन्नामलई यांनी 28 जुलैपासून रामेश्वरम येथून पदयात्रा काढण्याचे जाहीर केले आहे. “माझी जमीन, माझी जनता’ असे या यात्रेचे नाव असून, ही यात्रा 200 दिवस चालू राहणार आहे. ती 39 लोकसभा आणि 249 विधानसभा मतदारसंघांतून जाईल. या यात्रेच्या दरम्यान 11 मोठ्या जाहीरसभा होतील आणि यात्रेत अनेक केंद्रीय मंत्री व राष्ट्रीय नेते सहभागी होतील. 11 जानेवारी 2024 रोजी चेन्नईत ही यात्रा समाप्त होईल. यात्रेचा शुभारंभ करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार असून, या पदयात्रेच्या निमित्ताने तमिळनाडूत भाजपचे कमळ हे चिन्ह आणि भगवा रंग गावागावात पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. रामेश्वरम येथून ही यात्रा सुरू होत असून, त्याद्वारे भाजप योग्य ते संकेत देत आहे. स्वामी विवेकानंद यांनी 1893 साली अमेरिकेस भेट दिली होती, तेव्हा श्रावण महिन्यात स्वामीजींनी रामेश्वरपासून यात्रा सुरू केली आणि तेथेच तिची समाप्तीही केली. रामेश्वरम हे यात्रा सुरू करण्याच्या दृष्टीने अतिशय योग्य स्थळ असल्याचे भाष्य तमिळनाडूतील भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख एम. नचिप्पन यांनी केले आहे. या यात्रेच्या शुभारंभ सोहळ्यास अण्णाद्रमुकसह राज्यातील आपल्या आघाडीतील सर्व पक्षांना भाजपने आमंत्रण दिले आहे. एकीकडे पदयात्रेच्या माध्यमातून आपला धार्मिक अजेंडा रेटतानाच, मोदी सरकारची नऊ वर्षांची कामगिरी घराघरात पोहोचवायची आणि राज्यातील सत्ताधारी द्रमुक सरकारवर हल्लाबोल करायचा, अशी भाजपची नीती दिसते. अन्नामलई प्रत्येक मतदारसंघात कोपरासभा व ग्रामसभा घेतील, जनतेच्या तक्रारींची माहिती घेतील. भाजप अनेक राज्यांमध्ये निवडणुकीच्या पूर्वी अशाच प्रकारच्या यात्रा काढतो आणि त्यामधून रिझल्ट्सही मिळवतो.
विरोधी पक्षांच्या “इंडिया’ने बैठका घेतल्या, तरी ते फक्त सत्तेसाठी झगडत असतात, असा भाजपचा आरोप असतो. मग अशा यात्रा काढताना भाजपचा दुसरा कोणता उद्देश असतो? परंतु तमिळनाडूतील परिस्थिती आव्हानात्मक आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकांत तमिळनाडूत भाजपला फक्त 3.66 टक्के मते मिळाली व शून्य जागा मिळाल्या. 2021च्या विधानसभा निवडणुकांत भाजपला या राज्यात चार जागा मिळाल्या. वर्षानुवर्षे प्रयत्नशील राहूनही तमिळनाडूत भाजपला यश मिळत नाही, हे वास्तव आहे. पदयात्रेमध्ये द्रमुकचा कथित भ्रष्टाचार आणि घराणेशाही हेच टीकेचे लक्ष्य असेल. मात्र, त्याचवेळी स्टॅलिन मुख्यमंत्री झाल्यानंतर, म्हणजे गेल्या दोन वर्षांत द्रमुककडे प्रचंड औद्योगिक गुंतवणूक आकर्षित झाली आहे तसेच राज्याचा आर्थिक व सामाजिक विकासही झाला आहे.
जीडीपी किंवा ठोकळ राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत कर्जाचे प्रमाण घटले आहे, महसुली तूट कमी झाली आहे आणि “ईझ ऑफ डुइंग बिझिनेस’च्या क्रमवारीत तमिळनाडूचा नंबर बारावरून तीनवर आला आहे. स्टॅलिन सरकारवर उद्योगपती खूश असून, विविध क्षेत्रांतील उद्योगधंदे तेथे आकर्षित होत आहेत. या पार्श्वभूमीवर, अन्नामलई यांना टीका करताना वास्तवाचे भानही ठेवावे लागेल. गेल्या 17 नोव्हेंबर 2022 पासून तामिळ कार्तिक महिना सुरू झाल्याच्या निमित्ताने वाराणसीत काशी तमीळ संगमचे पंतप्रधानांनी अधिकृतपणे उद्घाटन केले होते. तमिळनाडू आणि काशी या शिक्षणाशी संबंधित देशातील दोन सर्वात महत्त्वाच्या आणि प्राचीन शैक्षणिक स्थळांमधील जुने दुवे पुन्हा शोधून, ते अधोरेखित करण्यासाठी 17 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीत वाराणसीत काशी तामिळ संगमचे आयोजन करण्यात आले होते. द्रमुकच्या स्टॅलिन कुटुंबाने भ्रष्टाचारातून दरवर्षी 30 हजार कोटी रुपये कमावले आहेत, असा आरोप एका क्लिपमध्ये करण्यात आला होता. त्याबाबत चौकशी करावी, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने राज्यपाल आर. एन. रवी यांना भेटून केली. मात्र, ही क्लिप बनावट असल्याचे पुढे दिसून आले. वास्तविक अन्नामलई यांनीच ही ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर टाकली होती.
अन्नामलई हे अननुभवी नेते आहेत, अशी टिप्पणी अण्णाद्रमुकचे नेते व माजी मुख्यमंत्री ईपीएस यांनी केली होती. अन्नामलाई यांनी अण्णाद्रमुकच्याही भानगडी बाहेर काढण्याचा सूचक इशारा दिल्यामुळे, ईपीएस त्यांच्यावरही तुटून पडले होते. या सर्व प्रकरणामुळे अण्णाद्रमुक व भाजप यांच्यात कटुता निर्माण झाली होती. आता ही कटुता कमी झाली असली, तरी दोन्ही पक्षांमधील संबंध एकदम सलोख्याचे आहेत, असे नाही. या यात्रेमुळे राज्यातील वातावरणात काय फरक पडतो, ते बघायचे.
टिप्पणी पोस्ट करा